नाशिक - नाशिकनंतर आता येवल्यातही कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून येवल्यात आज नव्याने 16 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे, येवल्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ही 109 वर जाऊन पोहचली असून यापैकी आत्तापर्यंत 51 जणांनी कोरोनावर मात करून घर वापसी केली आहे. तर, उर्वरित 51 जण हे कोरोना या आजारावर उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत कोरोनाने येवला तालुक्यात 7 जणांचा मृत्यू झाला आहे.
येवल्यात नव्याने 16 जण कोरोना पॉझिटिव्ह, बाधितांचा आकडा शंभरी पार
येवल्यात आज आणखी 16 जणांचे कोरोना पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. यामुळे येथील बाधितांची संख्या ही 109 वर जाऊन पोहचली असून यापैकी आत्तापर्यंत 51 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, उर्वरित 51 जण हे कोरोना या आजारावर उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत कोरोनाने येवला तालुक्यात 7 जणांचा मृत्यू झाला आहे.
येवल्यात कोरोना बाधितांचे संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच आज आणखी 16 जणांचे पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामुळे, प्रशासनाने घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी मोहीम सुरू केली आहे. वार्डनिहाय तपासणीदेखील करण्यात येत असून याकरता 73 पथके नेमण्यात आली आहेत. हे पथक त्याकडून प्रत्येक वार्डात जाऊन प्रत्येक घरातील नागरिकाची थर्मल गन व पल्स ऑक्सिमीटरद्वारे तपासणी करत आहेत. येवल्यातील पहिली संपर्क साखळी तुटल्यानंतर येवला शहर पूर्वपदावर येत असतानाच नागरिकांच्या बेफिकिरीमुळे मागील आठवड्यापासून कोरोनाचे पूर्ण संकट गडद होऊ लागल्याचे चित्र सध्या दिसत आहे. यात विनाकारण नागरिक रस्त्यावर, दुकानात, भाजीपाला खरेदीसाठी बाहेर पडताना दिसत आहेत. योग्य ती काळजी घेतली नाही तर गंभीर परिणामांना समोरे जावे लागेल हे लक्षात घेणे आवश्यक बनले आहे.
आत्तापर्यंत कोरोनाच्या सर्व पार्श्वभूमीवर सर्व बाधित क्षेत्र प्रतिबंधित केले आहे. त्या भागातील नागरिकांची आरोग्य तपासणी सुरू केली असून नगरपरिषदेकडून पाचशे मीटर परिसर निर्जंतुकीकरण करण्याचे कामही चालू आहेत. सध्या प्रतिबंधक उपाय म्हणून नगरपरिषदेने व्यावसायिकांसाठी सम-विषम हा फॉर्म्युला लागू केला असून तो तसाच राहणार आहेत. एकूणच बघता येवल्यात रोजच मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या आढळून येत असल्याने नागरिकांमध्ये मोठी धाकधूक वाढली आहे.