नाशिक: रस्ते, वाड्या, वस्त्यांची जातीवाचक नावे (caste based Names) हद्दपार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय समाज कल्याण विभागाने (Social Welfare Department) घेतला आहे. त्यानुसार नाशिक विभागातील शहरी क्षेत्रातील 190 नावे बदलण्यात आली आहेत तर ग्रामीण भागातील 1459 जातीवाचक नावे बदलण्यात आली आहेत. विभागातील शहरी भागात महानगरपालिकांच्या माध्यमातून लवकरात लवकर ही नावे बदलण्याची कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी विभागीय आयुक्त गमे यांनी सर्व संबंधित यत्रणांना दिले आहेत.
सामाजिक सलोखा जोपासणार :काही वस्त्यांची नावे महारवाडा, बौद्धवाडा, मांगवाडा, ढोरवस्ती, ब्राम्हणवाडा, माळी गल्ली, अशा स्वरुपाची नावे आहेत. या वस्त्यांना आता समता नगर, भीम नगर, ज्योती नगर, शाहू नगर, क्रांती नगर तसेच इतर तत्सम नावे देण्यात येणार आहेत. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात सामाजिक सलोखा आणि सौहार्द निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वाढण्याच्या दृष्टीने ही नावे बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी दलित वस्ती सुधार योजनेच्या नावात बदल करुन त्याऐवजी 'अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास' असे करण्यात आलेले आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार हे नाव बदलून 'डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार' असे करण्यात आलेले आहे.