मनमाड (नाशिक) : कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता करण्यात आल्यानंतर मनमाड शहरातील बाजार पेठा आणि दुकानांसाठी आजपासून (सोमवार) सम-विषम दिवसांचा नियम लागू करण्यात आला आहे. याची माहिती मुख्याधिकारी डॉ.दिलीप मेणकर यांनी दिली. या नव्या नियमानुसार सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दुकाने सुरु राहणार आहे. गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका जास्त आहे. त्यामुळे सम-विषम सुत्रानुसार बाजार पेठेतील अर्धी दुकाने सुरु तर अर्धी बंद राहणार आहेत. मात्र, असे असल्याने दुकाने कमी ग्राहक जास्त असे झाल्याने गर्दी कमी होण्याएवजी ती वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे गर्दीवर आळा घालण्यासाठी प्रशासनाने सम-विषम या नियमाचा फेरविचार करावा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक, दुकानदार आणि व्यावसायिकांनी केली आहे.
हेही वाचा...मुंबईत अखेर लोकल सेवा सुरू, अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांची बसच्या गर्दीतून सुटका
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी २२ मार्चपासून लॉकडाऊन सुरु करण्यात आले. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले होते. त्यानंतर आता लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिलता करत दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे दुकानदार, व्यावसायिक, हातावर पोट असणाऱ्यांसोबत सर्वसामान्य नागरिकांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु, लॉकडाऊनमध्ये थोडीसी सुट मिळताच नागरिकांनी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी करायला सुरुवात केल्याचे पाहून या गर्दीवर नियत्रण मिळवण्यासाठी मनमाड शहरात आता सम-विषम फॉर्म्युल्यानुसार दुकाने सुरु ठेण्यास सुरुवात केली आहे.
या फार्मुल्यानुसार शहरातील उत्तर आणि पूर्व दिशेकडे दर्शनी बाजू असलेली दुकाने आठवड्यातून तीन दिवस, एका दिवसाआड म्हणजे सोमवार, बुधवार, शुक्रवार तर पश्चिम आणि दक्षिण दिशेकडे दर्शनी बाजू असलेली दुकाने मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या तीन दिवशी सुरु राहणार आहेत. नव्या सम-विषम फॉर्म्युल्यानुसार एक दुकान आठवड्यातून फक्त तीन दिवस ते देखील एक दिवसाआड सुरु राहणार आहे.