नाशिक- कसबे वणी (ता. दिंडोरी) येथील बस स्थानकाजवळील जगदंब मिठाईच्या दुकानाला रात्रीच्या वेळी दीडच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यात मिठाई दुकानातील संपूर्ण साहित्य तसेच शेजारी असलेल्या मोबाईल दुकानाचे मोबाईल अॅक्सेसरीज जळून खाक झाले आहे.
यात अंदाजे साडेचार ते पाच लाख नुकसान झाले असून शासनाने मदत करण्याची मागणी दुकानदार करत आहेत. काल (दि.16 नोव्हेंबर) या मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास याठिकाणी आग लागली होती. बस स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या जगदंबा स्वीट्स आणि अथर्व मोबाईल या दुकानांना रात्रीच्या वेळी शॉर्टसर्कीटमुळे भीषण आग लागल्याचे प्राथमिक अंदाज आहे. रात्रीच्यावेळी काही तरुणांनी या दुकानांमधून धूर निघत असल्याचे बघितले. त्यानंतर त्यांनी तात्काळ मोबाईल दुकानाचे मालक अमोल गांगुर्डे यांना कळविले. अमोल गांगुर्डे यांनी आग लागल्याची बातमी मित्र परिवाराला कळवल्यानंतर तात्काळ सर्वजण याठिकाणी जमा होत आग विझविण्याचा प्रयत्न केला.
रात्रीची वेळ असल्याने आग विझविण्यात अडचणी येत होत्या पाण्याचे टँकर हे वेळेवर उपलब्ध झाले नाही. तोपर्यंत या दुकानाला लागून असलेले दुकाननातील साहित्य नागरिकांनी बाजूला काढले. शेजारीच वडापावचे दुकान होते. त्यात काही गॅसच्या टाक्या होत्या. त्या टाक्या तात्काळ नागरिकांनी बाजूला काढल्याने मोठा अनर्थ टळला. नंतर काही वेळात पाण्याचे टँकर याठिकाणी आले बादल्यांच्या साह्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला.
तोपर्यंत मिठाई दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले होते. तसेच अथर्व मोबाईल दुकानाचे पण मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दुकानात असलेले मोबाईलचे साहित्य जळून खाक झाले आहे. रात्री आग लागल्याची माहिती कळताच गावातील नागरिकांनी तात्काळ भेट देवून पंचनामा करण्यास विनंती केली.
वणी शहरात अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये अग्निशमन यंत्रणा नसल्याने आग विझवण्यामध्ये खूप अडचण येत आहे. यापूर्वीही आतापर्यंत पाच ते सहा वेळा वणी शहरात दुकानाला आग लागली होती. वणी शहरात अग्नीशमन यंत्रणा नसल्याने पिंपळगाव किंवा नाशिक येथून अग्निशामक बंब बोलवावी लागतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वेळ वाया जातो. वणी ग्रामपंचायत प्रशासनाने याबाबत गांभीर्याने विचार करणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.