नाशिक - शहरात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असून, दुसरीकडे नरभक्षक बिबट्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. मंगळवारी (16 मे) नरभक्षक बिबट्याने पुन्हा एकदा नाशिक रोडजवळ अंगणात खेळत असलेल्या चिमुकलीला फरफटत शेतात नेऊन तिला ठार केले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. बिबट्याने एका महिन्यात नागरिकांवर पाच वेळा हल्ले केले असून यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. या नरभक्षक बिबट्याला वन विभागाने तात्काळ जेरबंद करावे, अथवा गोळ्या घालून ठार मारावे, अशी मागणी देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज आहिरे यांनी वन मंत्री संजय राठोड यांच्याकडे केली आहे.
नाशिकच्या जाखोरी, चांदगिरी, एकलहरे, कालवी, सामनगांव, कोटमगावं, हिंगणवेढे, शिंदेपिंपळगाव खांब, भगूर, दोनवडे, पांढुरली, लहवीत, वंजारवाडी पळसे, चेहडी, शेवगेदारणा, बेलतगवाण, नाणेगाव, संसरी, वडनेर दुमला या परिसरात नरभक्षक बिबट्याचा वावर आहे. त्याच्या हल्ल्यात कुणाल पगारे ( वय 11 ), रुद्र शिरोळे ( 3 ), जिवाराम ठुबे (76 ), गुंजन नेहरे (3) यांचा मृत्यू झाला आहे.