नाशिक- शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे अद्यापही बुजवले गेले नसल्याने शनिवारी शिवसेनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले. खड्ड्यांमध्ये झाडे लावत आणि खड्ड्यांच्या ठिकाणी लांब उडी स्पर्धा घेत आंदोलन करण्यात आले. नाशिकच्या मखमलाबाद रोड, जकात नाका, गंगापूर रोड या ठिकाणाहून या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. पुढील काळात शहरातील विविध ठिकाणी हे आंदोलन करण्यात येणार आहे.
गेल्या काही दिवसांच्या पावसाने नाशिक शहरातील सर्वच रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघातांच्या प्रमाणात देखील वाढ झाली असून हे खड्डे त्वरित भरण्यात यावे अशी मागणी नागरिकांच्या वतीने जोर धरत आहे. काही दिवसांपूर्वी महापौर सतीश कुलकर्णी यांनी संबंधित विभागाला रस्त्यांवरील खड्डे त्वरित बुजवण्यात यावे यासाठी आदेश दिले होते. मात्र, तरीही हे काम संथगतीने सुरू असल्याने शनिवारी शिवसेनेच्यावतीने अनोखे आंदोलन करण्यात आले.