नाशिक- तुकाराम मुंढे हे नाशिकमध्ये आयुक्त असताना त्यांनी अनेक फाईली डब्यात घातल्या. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार आल्यानंतर त्या फाईली बाहेर काढल्या, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच यापुढे फाईली ढगात जाणार नाहीत, असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वत्र विकासकामांचा धडका सुरू आहे. विविध मंत्री, नेते यांच्याहस्ते विकासकामांचा शुभरंभ करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या विविध भागातील विकासकामांचा शुभारंभ करण्यासाठी शिवसेना नेते संजय राऊत आज नाशिक येथे आले असता, ते पत्रकारांशी बोलत होते.
सामाजिक काम शिवसेनेच्या रक्तात -
शहरातील विकासकामांचा शुभारंभ झाल्यानंतर घेण्यात आलेल्या सभेमध्ये शिवसेना नेते संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर टीकास्त्र डागले. शहरासह सिडको भागातील विकासकामे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आडमुठ्या धोरणामुळे प्रलंबित राहिली. तुकाराम मुंढेंनी फायली डब्यात घातल्या. मात्र, मुख्यमंत्र्यांनी पुन्हा फायली काढल्याचे सांगत राज्यात शिवसेनेच्या काळात काम होत असल्याचे स्पष्ट केले. तसेच नाशिकच राजकारण बदलले की राज्यचे राजकारण बदलत असल्याचेही राऊत म्हणाले. तसेच सामाजिक काम शिवसेनेच्या रक्तात असल्याचेदेखील त्यांनी यावेळी म्हंटले.