नाशिक- गरीब लोकांची वर्दळ असलेल्या जिल्हा रुग्णालय, बाजारपेठा, बस व रेल्वे स्थानके, शासकीय कार्यालये या ठिकाणी 'शिवभोजन' थाळीच्या माध्यमातून केवळ 10 रुपयांत गरीब व गरजू जनतेची भूक भागणार आहे, असे प्रतिपादन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील प्रेरणा महिला बचतगट संचलित बळीराजा रेस्टॉरंट येथे शिवभोजन केंद्राच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.उदघाटन झाल्यानंतर छगन भुजबळ यांनी स्वतः आपल्या हाताने लाभार्थींना शिवभोजन थाळी दिली.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार हिरामण खोसकर, बाजार समिती सभापती शिवाजी चुंबळे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, उपायुक्त पुरवठा अर्जुन चिखले, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर, पोलीस निरीक्षक अशोक भगत, प्रेरणा महिला बचतगट अध्यक्षा कविता कर्डक आदी उपस्थित होते.
यावेळी भुजबळ म्हणाले, शिवभोजन योजना ही राज्यातील गोरगरीब नागरिकांसाठी कमी दरात पोटभर जेवण देणारी सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राज्यभर 50 हून अधिक ठिकाणी शिवभोजन प्रकल्प सुरू होत आहे. नाशिक जिल्हयामध्ये 4 ठिकाणी याचे प्राथमिक स्वरूपात उदघाटन होत आहे. यातून दररोज 700 नागरिकांना जेवण दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवभोजन केंद्रावर स्वच्छ स्वरुपात आणि चांगल्या दर्जेचे जेवण सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानुसार शिवभोजन केंद्रांची व त्याअंतर्गत दिल्या जाणाऱ्या भोजनाची नियमित तपासणी करण्यात येणार आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्वावर राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयी किमान 1 भोजनालय तसेच प्रत्येक भोजनालयात कमाल 500 थाळी सुरु करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे. यास मिळणारा प्रतिसाद पाहून ही योजना राज्याच्या इतर भागात राबविण्यात येईल, असे भुजबळ यांनी सांगितले.