नाशिक- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत राज्यातील गरीब, कष्टकरी व विद्यार्थी उपाशी राहू नये, यासाठी राज्यात दररोज सकाळी 11 ते 3 या वेळेत 1 लाख शिवभोजन थाळीचे वितरण केले जाणार आहे, अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. त्याचबरोबर शिवभोजन थाळीचे दर पाच रुपये करण्यात आले आहे. हे दर जून महिन्यापर्यंत असतील, असेही मंत्री भुजबळ यांनी सांगितले.
कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी केली आहे. यामुळे प्रत्येकजण आहे त्या ठिकाणी अडकून बसला आहे. यामुळे राज्यातील गरीब जनता, विद्यार्थी, मजूर यांच्यावर उपासमारीची वेळ येत आहे. त्यामुळे ते कसल्याही परिस्थितीत आपला गाव गाठण्यासाठी प्रयत्न करत आहेत. म्हणून शिवभोजन थाळीच्या संख्येत पाचपटीने वाढ करण्यात आली असल्याने मंत्री भुजबळ यांनी सांगितले. शहरी भागातील शिवभोजन केंद्रासाठी प्रति थाळी 45 रुपये व ग्रामीण भागातील केंद्रासाठी प्रती थाळी 30 रुपये शासन देणार आहे. यासाठी 160 कोटींची तरतूद शासनाने केली आहे.
शिवभोजन चालकांनी ग्राहकांना हात धुण्यासाठी साबण उपलब्ध करून द्यावीत. तसेच भोजनालय दररोज निर्जंतुक करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. भोजनालय चालकांनी ग्राहकांना शक्यतो पॅकिंग स्वरूपात जेवण उपलब्ध करून द्यावे. जेवण बनविण्यापूर्वी हात कमीत कमी वीस सेकंद साबणाने स्वच्छ करावे. शिवभोजनाची सर्व भांडी निर्जंतुक करून घ्यावीत. भोजन तयार करणाऱ्या तसेच वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वारंवार साबणाने हात धुवावित. भोजनालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी मास्कचा वापर करावा. त्याचबरोबर भोजनालय चालकाने प्रत्येक ग्राहकांमध्ये कमीत-कमी तीन फूट अंतर राहील याची दक्षता घ्यावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ पाच रुपयांत शिवभोजन थाळी मिळणार असल्याने राज्यातील गरजू, गोरगरीब, शेतकरी, कामगार व मजूर वर्गाला शासनाच्या या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.