नाशिक- शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. कारण नसताना राजकारण करून अस्थिरता निर्माण करू नये, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. पवार यांनी आज जम्मू काश्मीरमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत वीरमरण आलेल्या निनाद मांडगवणे यांच्या निवास्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यावेळी ते बोलत होते.
राजकारण न करता हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे रहा - शरद पवार
नाशिकमधील हुतात्मा जवान निनाद मांडगवणेच्या कुंटुबीयांची शरद पवारांनी घेतली भेट.. राजकारण न करता हुतात्मा जवानांच्या कुटुबीयांच्या पाठिशी उभे राहण्याचे केले आवाहन... म्हणाले २०० दहशतवादी मारल्याचा अमित शाहांचा दावा खोटा
पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय वायू दलाच्या जवानांनी पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये हवाई हल्ले करून प्रत्युत्तर दिले. त्या एअर स्ट्राईकमध्ये 200 दहशतवादी मारले असल्याचा दावा भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी केला आहे. मात्र, त्यांचा तो दावा चुकीचा आहे. मी पण देशाचा संरक्षणमंत्री होतो. पण कुठल्याही घटनेची संपूर्ण तंतोतंत माहिती घेतल्या शिवाय मी कोणतेही वक्तव्य कधीच केले नाही. त्यामुळे सत्ताधारी पक्षाने या घटनेवरून देशाचे चित्र बद्दलण्याचा प्रयत्न करू नये, असा सल्लाही पवार यांनी यावेळी दिला.
देशाचे जवान हुतात्मा होतात, त्याची परतपेढ, त्याची भरपाई जगातल्या कुठल्याही शक्ती करू शकत नाहीत, याची जाणीव ठेवून देशात स्थिरता शांतता कशी नांदेल यासाठी काम करणे गरजेचे असल्याचेही पवार म्हणाले. या भेटीवेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार अपूर्व हिरे, माजी जिल्हा अध्यक्ष रविंद्र पगार आदी उपस्थित होते.