नाशिक :राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नाशिकबद्दल अनेक आठवणी सांगत असतात. त्यांचे या भागावर विशेष प्रेम आहे. या प्रेमापोटी येवल्याच्या जनतेने मुद्दामहून बोलावले आहे. पवार यांची आशीर्वाद देण्याची पध्दत जरा वेगळी आहे. येवल्यात ते आशीर्वाद देतील त्याचे परिणाम मोठे असतील. ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना चांगल्या हेतूने आशीर्वाद देतील, असे सांगत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी बंडखोर मंत्री छगन भुजबळ यांना एकप्रकारे इशारा दिला. भाजप फोडाफोडी करणारा पक्ष असून पक्ष फुटल्याचे खापर एकट्या अजित पवारांना देऊन चालणार नाही, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे. ते आज नाशिक दौऱ्यावर असतांना पत्रकारांशी संवाद साधत होते.
स्वार्थासाठी अजित पवारांचा वापर : राष्ट्रवादी पक्ष फुटल्याचे खापर अजित पवारांवर फोडता येणार नाही. शरद पवार यांची येवल्यात आज सभा होणार आहे. काकांच्या बाबतीत मी भावनिक आहे. भाजप फोडाफोडी करणारा पक्ष असून पक्ष फुटल्याचे खापर एकट्या अजित पवारांना देऊन चालणार नाही. त्यांच्या आजुबाजूच्या लोकांनी स्वत:च्या स्वार्थासाठी अजित पवारांना नेतृत्व करायला लावले, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. अजित पवार कर्तुत्ववान नेते असल्याने भाजपने त्यांना जवळ केले. पण असे कर्तुत्ववान नेतृत्व भाजप संपवते ते अजित पवारांच्या बाबतीत होऊ नये अशी, भिती रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादी पक्ष कुणीही घेऊ शकत नाही :जे लोक गेले ते कशासाठी गेले हे सामान्य लोकांना माहिती आहे. त्यामुळे त्यांच्यावर बोलून वेळ वाया घालवायचा नाही, असे खासदार शरद पवारांचे मत आहे. घर भाजपने फोडले असून आमच्या मताचे विभाजन होऊन फायदा व्हावा असा भाजपचा हेतू उघड आहे. त्यामुळे भाजप विरोधात संघर्षाची भुमिका आम्ही घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी पक्ष कुणीही घेऊ शकत नाही. पवार साहेब यांच्याकडे बघून लोक मतदान करतात असा टोला त्यांनी बंडखोरांना लगावला.