दिंडोरी( नाशिक)-बिबट्याने म्हेळूस्के (ता.दिंडोरी) येथील बनकर वस्तीवर रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास हल्ला करून सात शेळ्या ठार केल्या आहेत. शेतकरी प्रकाश बनकर यांच्या शेतात बिबट्या हा हल्ला केला आहे.
शेतकरी प्रकाश बनकर यांच्या शेतावर मोलमजुरी करण्यासाठी दत्तू गायकवाड हे आपल्या कुटुंबियांसमवेत राहतात. मोलमजुरी बरोबरच संसाराला आधार म्हणून ते शेळीपालनही करत होते. परंतु, रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांवर अचानक बिबट्याने हल्ला केला. यावेळी बिबट्याच्या हल्ल्यात सहा शेळ्या जागेवर ठार झाल्या आहेत. तर एक शेळी बिबट्याने अंधाराचा फायदा घेत फस्त केली. शेतकरी गायकवाड यांच्याकडे सुरुवातीला केवळ एक शेळी होती. त्यानंतर त्यांनी सात शेळ्या सांभाळल्या होत्या.