नाशिक : मनसे नेते अमित ठाकरे हे उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. धुळे, नंदुरबारनंतर शनिवारी त्यांनी अहमदनगरमधे कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यानंतर अमित ठाकरे हे मुंबईच्या दिशेने येत होते. रात्री अडीच वाजेच्या सुमारास सिन्नर तालुक्यातील गोंदे फाटा या ठिकाणी असलेला बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा टोल नाका, मनसे नाशिक शहर अध्यक्ष दिलीप दातीर यांसह त्यांच्या 10 ते 15 कार्यकर्त्यांनी फोडला. याप्रकरणी पोलिसांनी गंभीर दखल घेत शुभम थोरात, शैलेश शेलार, बाजीराव मते, ललित वाघ, प्रतीक राजगुरू, शशिकांत चौधरी, स्वप्निल पाटोळे या मनसैनिकांना अटक केली आहे. याप्रकरणातील चार ते पाच जण फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
म्हणून फोडला होता टोल नाका: मनसे नेते अमित ठाकरे यांना टोलनाक्यावर अर्धा तास थांबवल्यानंतर संतप्त झालेल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तोडफोड केल्याचे समोर आले आहे. या तोडफोडीत संपूर्ण समृद्धी टोलनाक्याचे नुकसान झाले. 22 जुलै रोजी सायंकाळी अमित ठाकरे अहमदनगरहून सिन्नरच्या दिशेने जात होते. समृद्धी महामार्गच्या सिन्नर टोल प्लाझा येथे अमित ठाकरे यांचा ताफा सुमारे अर्धा तास थांबला होता. यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मध्यरात्री टोलनाक्याची तोडफोड केली.