नाशिक - मंत्रिमंडळ विस्तार 30 डिसेंबरलाच होणार आहे. तसेच त्यात बदल होणार नाही आणि कोणत्याही खात्यासंदर्भात कोणत्याही पक्षाचे घोडे अडलेले नाही, शिवसेनेचे ज्येष्ठ आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने छगन भुजबळ आणि संजय राऊत एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी राऊत हे बोलत होते. तर, कधीकाळी एकमेकांवर खडसून टीका करणारे हे दोन्हीही नेते आज एकमेकांवर स्तुतिसुमने उधळली. तर भाषणादरम्यान दोन्हीही नेत्यांनी भाजपवर टीका केली.
यावेळी संजय राऊत यांच्याबद्दल बोलताना भुजबळांनी संजय राऊत हे आचार्य अत्रेंप्रमाणे असल्याचे म्हणत त्यांची स्तुती केली. तर राऊत यांनीही भुजबळांनी दिल्लीत बांधलेल्या महाराष्ट्र सदनाचा उल्लेख करत त्यांच्या विकासकामांचे कौतुक केले. भुजबळांनी राऊत यांना आचार्य अत्रे म्हटल्यानंतर राऊत म्हणाले, अत्रे मोठे होते. भुजबळांनी आचार्य अत्रे नाही म्हटले. त्यांच्याप्रमाणे काम केले असे म्हटले. तसेच सरकार बनविण्यासाठी सामनामधून काम केले म्हणून भुजबळांनी स्तुती केल्याचेही ते म्हणाले.
हेही वाचा -"बोलाचीच कढी बोलाचाच भात"
खाते वाटपाचे अधिकार मुख्यमंत्र्यांना आहेत आणि खातेवाटप पूर्ण झाले आहे. सरकारमध्ये सामील झालेल्या इतर 2 पक्षप्रमुखांनी याबाबत मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केलेली आहे. या प्रक्रियेमध्ये कुठेही घोडे अडलेले नाही. कोणतेही खाते कोणत्याही मंत्र्यांकडे असले तरी त्याचे अधिकार मुख्यमंत्र्याकडे असतात, असेही राऊत यांनी यावेळी सांगितले. पुढे बोलताना राऊत म्हणाले, पवार साहेबांबद्दल मी बोलत होतो, आता उद्धव ठाकरे बोलत आहेत. पवारसाहेब काय आहेत हे मी सांगत होतो तेव्हा लोक माझ्याकडे भुवया उंचावून पाहत होते. पवार साहेबांबद्दल उद्धव ठाकरे जे बोलत आहेत याचा आनंद आहे.