महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शाळेतील शिक्षकांकडून नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी; नाशिक मनपाचा उपक्रम - नाशिक आरोग्य विभाग

आता नाशिक महानगरपालिकेने मनपा शाळेतील 600 शिक्षकांना शहरातील घराघरात जाऊन प्रत्येक व्यक्तीची कोरोना बाबतची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्याची आणि इतर दुर्धर आजाराबाबत माहिती संकलित करण्याची जबाबदारी दिली आहे.

शाळेतील शिक्षकांकडून नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी; नाशिक मनपाचा उपक्रम

By

Published : Jul 27, 2020, 4:32 PM IST

नाशिक - जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून आतापर्यंत 10 हजारांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली असून चारशेहून अधिक जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे, तर रोज ह्यात 400 ते 500 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत आहे. यासाठी आता नाशिक महानगरपालिकेने मनपा शाळेतील 600 शिक्षकांना शहरातील घराघरात जाऊन प्रत्येक व्यक्तीची कोरोना बाबतची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्याची आणि इतर दुर्धर आजाराबाबत माहिती संकलित करण्याची जबाबदारी दिली आहे.

'आरोग्यदायी नाशिक', 'कोरोनामुक्त नाशिक' या संकल्पनेतून नाशिक महानगरपालिकेने वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी महानगरपालिका शाळेतील 600 शिक्षकांची फौज मैदानात उतरवली आहे. शिक्षकांना यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. कोरोना संजीवनी अ‌ॅपच्या माध्यमातून प्रत्येक घरातील व्यक्तीची प्राथमिक तपासणी केली जात आहे. ह्यात तापमान, शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण, हृदयाचे ठोके तपासले जात आहेत. तसेच घरातील कुठल्या व्यक्तीला मधुमेह, कँसर, दमा, अर्धांगवायू, हृदयविकार अशा प्रकारचे दुर्धर आजार आहेत का, याचीदेखील नोंद घेतली जात आहे. कुठल्या विभागात किती रुग्ण आहेत ही माहिती महानगरपालिकेकडे संकलित होणार आहे. भविष्यात जर कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढला तर रुग्णांना सतर्क करता येणार असल्याचा यामागचा उद्देश आहे.

कुठली माहिती संकलित केली जाते?

घरातील प्रत्येक व्यक्तीच्या शरीराचे तापमान, ऑक्सिजनचे प्रमाण, हृदयाचे ठोके तपासले जातात. घरात कुठल्या व्यक्तीला दुर्धर आजार आहे का, ह्याची माहिती घेतली जाते. कुटुंबप्रमुखाचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक आदी माहिती घेतली जात आहे.

शिक्षक कामावर, विद्यार्थी वाऱ्यावर -

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सरकारने अद्याप शाळा सुरू करण्यास परवानगी दिली नसली तरी शाळांना ऑनलाइन शिक्षण देण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. अशात नाशिक शहरातील सर्वच खासगी शाळांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, दुसरीकडे नाशिक महानगरपालिकेकडून मनपाच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अद्याप वाऱ्यावर आहे. शहरातील नाशिक महानगरपालिकेच्या शाळेत 30 ते 35 हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून कोरोना काळात महानगरपालिकेने ह्या विद्यार्थ्यांकडे पुरते दुर्लक्ष केले आहे. अनेक मुलांच्या पालकांकडे अँड्रॉईड मोबाईल नसल्याने ह्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी अडचणी येत असल्याचे कारण मनपा शिक्षण विभागाने पुढे केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details