नाशिक :पदवीधर मतदार संघाच्या लढतीत विजय मिळवल्यानंतर सत्यजीत तांबेंनी पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. सत्यजीत तांबेंनी पत्रकार परिषद घेत नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कॉंग्रेसवर आरोप करत ते म्हणाले की, काँग्रेसच्या कार्यालयाकडून दोन चुकीचे एबी फॉर्म देण्यात आले. माझा स्पष्टपणे आरोप आहे, की बाळासाहेब थोरात आणि आमच्या परिवाराला बदनाम करण्यासाठी हेतू पुरस्कर तसेच जाणीवपूर्वक एक षडयंत्र रचले गेले.
सत्यजीत तांबेंचा गंभीर आरोप :कॉंग्रेसने आम्हाला बदनाम करण्यासाठी त्याची स्क्रिप्ट तयार केली. त्याचा स्क्रिप्टचा पार्ट म्हणून माझ्या माणसाला बोलावले. दहा-बारा तास बसवून ठेवले. बंद पाकिटात फॉर्म दिले. ते फॉर्म चुकीचे दिले, असा गंभीर आरोप नाशिक पदवीधर मतदारसंघाचे विजयी आमदार सत्यजीत तांबे यांनी केला आहे. सत्यजीत तांबे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. विशेष म्हणजे आपले मामा आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना अडचणीत आणण्याचे षडयंत्र होते, असा गंभीर आरोप देखील सत्यजीत तांबे यांनी केला. त्यामुळे आता काँग्रेस पक्षामध्ये मोठी धुसफूस असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दिल्लीतून नाव आले :ते पुढे म्हणाले की, मला आता असे सांगत आहेत की, निर्णय तुम्हाला घ्यायचा होता की, कोण उभे राहणार? मग बरोबर साडेबारा वाजता दिल्लीतून माझ्या वडिलांची उमेदवारी का जाहीर करण्यात आली? महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे नाव दिल्लीतून आले नाही. मग एकच उमेदवारी दिल्लीतून का जाहीर झाली? असे प्रश्न सत्यजित तांबे यांनी उपस्थित केले.
सत्यजीत तांबे काय म्हणाले? : सत्यजीत तांबे पत्रकार परिषदेत म्हणाले की, एका बाजूला मला पक्ष संधी देऊ शकत नाही. संघटना संधी देऊ शकत नाही. त्यामुळे माझ्या वडिलांना वाटले की, तुझा पक्ष आणि संघटना तुला संधी देऊ शकत नसेल तर मीच काहीतरी केले पाहिजे. एक पित्याची भूमिका म्हणून त्यांनी मला निवडणुकीच्या 15 दिवस आधी फॉर्म जाहीर झाल्यानंतर सांगितले की, सत्यजित मला असे वाटते की ही निवडणूक तू लढायला पाहिजे. मला अनेक कार्यकर्ते आणि नेत्यांनी सांगितले, असे ते म्हणाले होते. पण मला वडिलांच्या जागेवर उभे राहायचे नव्हते. त्यामुळे सुरुवातीला आम्ही चर्चा केली. नंतर आम्ही आमच्या घरामध्ये चर्चा केली.