नाशिक -कोरोनामुळे देशात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे बाजार समित्या कधी सुरू आहेत तर कधी बंद आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. ऐन उन्हाळ्यात जीवाचे रान करुन तसेच लाखो रुपये खर्च करून पिकविलेल्या टोमॅटोला बाजारपेठ मिळत नसल्याने, उभ्या पीकात जनावर सोडण्याची वेळ सटाणा तालुक्यातील शेतकऱ्यांवर आली आहे. काही शेतकरी तर उभ्या पिकावर नांगर फिरवत असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे.
दोन वर्षांच्या दुष्काळानंतर, यंदाच्या वर्षी उन्हाळ्यात मुबलक प्रमाणात पाणी असल्याने यंदा दोन पैसे मिळतील या आशेने शेतकऱ्यानी मोठ्या प्रमाणात भाजीपाला तसेच टरबूज, खरबूज, काकडी यासारख्या पिकांची लागवड केली होती. मात्र, कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शेतीमालाला बाजारपेठ मिळत नाही. यामुळे शेतीमाल शेतातच खराब होत आहे. पिकासाठी केलेला खर्चही यातून निघत नसल्याने, शेतकरी उभ्या पिकात जनावर सोडत आहेत.
व्यापारी सद्या टोमॅटो २ ते ४ रुपये किलो दराने शेतकऱ्यांकडून खरेदी करत आहेत. या मिळणाऱ्या दरात टोमॅटो घेऊन गेलेले गाडीभाडेही निघत नाही. टोमॅटोसाठी शेतीची मशागत, ठिबक, मल्चिंग पेपर, खत, औषध, मंडपासाठी तार, बांबू, सुतळी, बांधणी, तोडणी (काढणी ) मजुरी आदी खर्चाचा विचार केला तर एकरी लाख रुपये खर्च करूनही हातात मात्र कोऱ्या पावत्या पडत आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.