नाशिक - ग्रामपंचायत निवडणुकीचा निकालानंतर विजयाचा गुलाल उधळला गेला असून आता येत्या गुरुवारी (दि.२८) ११ तालुक्यातील ८१० ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत निघणार आहे. तालुका स्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत काढली जाईल. त्याकडे राजकीत वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
तहसीलदार स्तरावर आरक्षण सोडतीचे अधिकार -
जिल्ह्यातील ५६५ ग्रामपंचायतीचे निकाल सोमवारी (दि.१८) लागले. त्यानंतर गावचा सरपंच कोण होणार याकडे लक्ष लागून होते. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील अंशत:अनुसुचित क्षेत्रातील पाच तालुके आणि बिगर अनुसूचित क्षेत्रातील सहा तालुके अशा ११ तालुक्यांसाठीच्या ८१० ग्राम पंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत गुरुवारी निघणार आहे. प्रत्यक्ष मतदानापूर्वीच ५५ ग्रा़मपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. देवळा तालुक्यातील उमराणे येथील निवडणूक प्रक्रिया निवडणूक आयोगाने रद्द केली होती. निकालानंतर या ६२१ ग्राम पंचायतीचे सरपंच कोण असतील याची उत्सूकता शिगेला पोहचली आहे. त्यासाठीच्या आरक्षण सोडतीची तारीख देखील ग्रामविकास विभागाने जाहीर केलीआहे.