नाशिक: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शपथविधीला हजेरी लावणाऱ्या देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नाही. शरद पवार गटात की, अजित पवार गटात जायचे याबाबत मतदारांशी चर्चा करून निर्णय घेऊ असे आमदार अहिरे यांनी म्हटले आहे. अजित पवार यांच्या शपथविधीनंतर मानसिक धक्का बसल्याचेही त्या म्हणाल्यात. त्यामुळे सरोज अहिरे या दोन्ही दरडीवर हात ठेवतात का प्रश्न उपस्थित होत आहे.
नेमका पाठिंबा कोणत्या गटाला: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट निर्माण झाल्यानंतर आमदारांचा पाठिंबा नेमका कोणत्या गटाला, याबाबत फैसला बुधवारीच्या मुंबईतील बैठकीत होणार होता. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांकडे दोन्ही गटाचे लक्ष लागून होते. राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ, अजित पवारांसोबत असल्याने जिल्ह्यातील आमदार हे अजित पवार गटात सहभागी होतील असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र देवळालीच्या आमदार सरोज अहिरे या आजारी असल्याने, त्यांच्या भूमिकेबाबत अद्याप सस्पेन्स कायम आहे. मतदारसंघातील मतदारांशी चर्चा करून पाठिंब्याबाबत निर्णय घेऊ असे त्यांनी म्हटले आहे, मात्र नेमका पाठिंबा कोणत्या गटाला हे मात्र गुलदस्त्यात आहे.