नाशिक - संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीने सकाळी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले आहे. पहाटेच्या सुमारास पारंपरिक पूजा विधी झाल्यानंतर टाळ-मृदंगाच्या गजरात मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत ही पालखी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे रवाना झाली आहे. कोरोनाच्या फेऱ्यातून वाचवी जगाला, सुखी ठेव देवराया माझ्या भारत देशाला, असे म्हणत 32 वारकरी हे शिवशाही बस मधुन निवृत्तीनाथ महाराजांची पालखी घेऊन पंढरपूरकडे रवाना झाले आहेत.
वाखरी येथे सर्व मानाच्या पालख्यांची भेट होणार -
राज्यातील दहा मानाच्या पालख्यांचे आज प्रस्थान होत आहे. निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान झाले आहे. पालखीचा प्रवास हा त्र्यंबकेश्वर ते वाखरीपर्यंत पहिला टप्पा असणार आहे. वाखरी येथे सर्व मानाच्या पालख्यांची भेट होणार आहे. तेथून सर्व पालख्या पायी पंढरपूरकडे रवाना होणार आहे. एका पालखीसोबत दोन बस शासनाने दिल्या आहेत. 32 वारकरी आणि काही शासकीय अधिकारी त्यांची आरटीपीसीआर टेस्ट होणार आहे. पौर्णिमेपर्यंत सर्व पालख्यांचा मुक्काम पंढरपूरला असणार आहे. यानंतर 24 तारखेला सर्व वारकरी परतीचा प्रवास करतील, असे निवृत्ती महाराज संस्थानचे पुजारी जयवंत गोसावी यांनी सांगितले.