नाशिक - संजय राऊत आज नाशक दौऱ्यावर आहेत. त्यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन काही मुद्दे स्पष्ट केले. ते म्हणाले की राज्यातील शिवसेना सोडून गेलेले उद्धव ठाकरे यांना सोडून गेलेले नेते आणि त्यांची गद्दारी ही कधीही विसरता येणार नाही. गद्दार ही सूर्याजी पिसाळाची औलाद आहे, या शब्दात पुन्हा एकदा संजय राऊत यांनी सुनावले आहे. राऊत यांनी इतरही अनेक मुद्यांवर भाष्य केले.
भाजपबरोबर जाण्याचा प्रश्नच नाही - संजय राऊत यांच्यावर भाजपबरोबर पुन्हा सूत जुळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे. मात्र आमच्या मनात पक्ष बदलण्याचा प्रश्नच नाही असे ते म्हणाले. त्यापुढे बोलताना राऊत म्हणाले की ज्यांचं जळतं त्यानाच कळतं, आम्ही भोगतो आहोत. त्यामुळे भाजपबरोबर पुन्हा जाण्याचा प्रश्नच नाही. त्यांच्याबरोबर सूत जुळवण्याच्या वावड्या जे कुणी उठवत असतील, त्यांनाच याबाबत विचारले पाहिजे असेही राऊत म्हणाले. भाजपसोबत सूत जुळवण्याचा प्रयत्न केल्याचा मुद्दाच राऊत यांनी धुडकावून लावला.
शिवराज्याभिषेक सोहळा अगदीच हास्यास्पद प्रकार - सत्ताधाऱ्यांनी नुकताच शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केल्या याबाबतही संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. मात्र सत्ताधारी जे काही करत आहेत ते अगदीच हास्यास्पद गोष्ट असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. महाराजांचा राज्याभिषेक ही मोठी गोष्ट आहे. त्यात शंकाच नाही. मात्र सत्ताधारी निवडणुकीवर डोळा ठेवून काहीतरी करत आहेत. त्यांना फक्त त्यांचे काही काम असेल तरच अशा थोर विभूतांची पुळका येतो. त्यातून ते इव्हेंट साजरे करतात. त्यामध्ये आपुलकी प्रेम हे कमी असते. मात्र त्यातून मिळणाऱ्या फायद्यावर सत्ताधाऱ्यांचा डोळा असतो अशा आशयाचे वक्तव्य राऊत यांनी यावेळी केले.