सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीसह इस्लामपूर आणि विटा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पार पडल्या आहेत. जिल्ह्यातल्या सात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पार पडत आहेत. यामध्ये शिराळा आणि पलूस या दोन बाजार समित्या बिनविरोध झाल्या आहेत.त्यामुळे पाच बाजार समितीच्या निवडणुका लागल्या आहेत. यापैकी सांगली, इस्लामपूर आणि विटा कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी गुरुवारी मतदान झाले होते. सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती जिल्ह्यातली सगळ्यात मोठी बाजार समिती समजली जाते. देशात देखील या बाजार पेठेचे मोठी ओळख आहे. सुमारे एक हजार कोटीहुन अधिक उलढाल असणाऱ्या सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत जत, कवठेमहांकाळ, मिरज कृषी उत्पन्न बाजार समितीसह विष्णुअण्णा फळ मार्केटचे कामकाज चालते.
महाविकास आघाडी विरुद्ध भाजप:सांगली बाजार समितीवर वर्चस्व ठेवण्यासाठी जिल्ह्यातल्या दिग्गज नेत्यांची नेहमीच प्रतिष्ठापनाला लागते, आतापर्यंत या बाजार समितीमध्ये सर्वपक्षीय नेत्यांकडून आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढवल्या जात होत्या. यंदा या बाजार समितीमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत पार पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे माजी मंत्री विश्वजीत कदम, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, काँग्रेसने जयश्री पाटील, काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि शिवसेना ठाकरे गटाचे माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली नेतृत्वाखाली शेतकरी पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढवली गेली. भाजपाचे कामगार तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे, भाजपाचे खासदार संजय काका पाटील आणि जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने देखील महाविकास आघाडी विरोधात शेतकरी परिवर्तन पॅनल मैदानात उतरवले होते.
17 उमेदवार विजयी झाले: गुरुवारी या बाजार समितीचा 18 जागांसाठी अत्यंत चुरशीने मतदान पार पडले. 24 मतदान केंद्रांवर झालेल्या मतदानामध्ये जवळपास 92 टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली. शुक्रवारी सकाळी मिरज येथे मतमोजणी पार पडली आहे. ज्यामध्ये महाविकास आघाडीचे 17 उमेदवार विजयी झाले आहेत. तर व्यापारी-अडते गटातून अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपच्या उमेदवारीला 1 जागी पण विजय मिळवता आला नाही. त्यामुळे भाजपाला या ठिकाणी आपले खाते देखील उघडता आले नाही.