नाशिक -साधरणपणे महिलांची सकाळ ही घरकामापासून होते. या कामामध्ये दिवस कधी संपतो हेही त्यांना कळत नाही. मात्र ,नांदगांव येथील शिक्षिका असलेल्या संगीता सोनवणे यांच्या दिवसाची सुरुवात वेगळ्या पद्धतीने होते. गेल्या अनेक वर्षांपासून सकाळी उठल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा स्वच्छ करून संगीता दिवसाची सुरुवात करतात.
नांदगावच्या शिक्षिकेची अनोखी शिवभक्ती, महाराजांचा पुतळा स्वच्छ करून दिवसाची सुरुवात - नांदगावच्या शिक्षिकेची शिवभक्ती
नांदगांव येथील शिक्षिका असलेल्या संगीता सोनवणे यांच्या दिवसाची सुरुवात वेगळ्या पद्धतीने होते. गेल्या अनेक वर्षांपासून सकाळी उठल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा स्वच्छ करून संगीता आपल्या दिवसाची सुरुवात करतात.
शहरातील नगर पालिकेच्या शाळेत शिक्षिका असलेल्या संगीता सोनवणे यांनी गेल्या 8 ते 9 वर्षांपासून एक अनोखा छंद जोपासला आहे. शहरातील पालिकेच्या समोरील शिवस्मृती मैदानात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. संगीता दररोज सकाळी न चुकता स्वच्छ झाडाझुड करून पुतळा पाण्याने धुऊन काढतात. स्वखर्चाने नवीन शाल आणि पुष्पहार अर्पण करून महाराजांना मानाने मुजरा करतात. उन्हाळा पावसाळा किंवा हिवाळा असो, त्यांच्या नित्यक्रमात कधीच खंड पडत नाही.
छत्रपती शिवरायांनी जनतेसाठी अनेक चांगले उपक्रम सुरू केले. आजही त्यांच्या धोरणाच्या आधारावर जग सुरू आहे. त्यामुळे फक्त जयंतीनिमित्त पुतळ्याची स्वच्छता करणे, मला मान्य नाही, असे संगीता म्हणाल्या. सोनवणे यांची ही शिवभक्ती जिल्हाभरात चर्चेचा विषय ठरली आहे. संगीता सोनवणे यांची शिवभक्ती पाहून त्यांना महिला संघटना तसेच सामाजिक संघटनांनी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.