महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाळू तस्करी विरोधात आवाज उठवणाऱ्यांना पोलिसांची नोटीस - वाळू तस्करी न्यूज

बागलाण तालुक्यातील मोसम नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी होत आहे. तसेच मुजोर वाळू तस्करांची वाढती दादागिरीही याठिकाणी वाढत आहे. याविरोधात आवाज उठवणाऱ्यांना पोलिसांनी नोटीस पाठवल्याचा प्रकार घडला आहे.

nashik
मोसम नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी

By

Published : May 14, 2020, 4:32 PM IST

नाशिक - बागलाण तालुक्यातील मोसम नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी होत आहे. तसेच मुजोर वाळू तस्करांची वाढती दादागिरीही याठिकाणी वाढत आहे. यासंदर्भात विविध माध्यमातून आवाज उठवला गेला. मात्र, याकडे दुर्लक्ष करणाऱ्या यंत्रणेविरोधात लोकशाही मार्गाने आवाज उठवणाऱ्या तरुणांना जायखेडा पोलीस नोटीस पाठवून आवाज दडपण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.

बागलाण तालुक्यातील जायखेडा परिसरातील मोसम नदीतून मोठ्या प्रमाणात वाळूची चोरुन वाहतूक सुरु आहे. मोटार सायकल तसेच रात्री ट्रॅक्टरद्वारे वाळू तस्करी केली जात आहे. यावर अंकुश ठेवण्याची जबाबदारी असलेली शासकीय यंत्रणा कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे अतिरिक्त कामात अडकली असल्याचा गैरफायदा घेत मोठ्या प्रमाणात वाळूची चोरी वाढली आहे. कमी मेहनत व कुठलेही भांडवल न अडकवता भरमसाठ पैसा मिळून देणार धंदा म्हणून गुंड प्रवृत्तीचे लोक या धंद्यात उतरले आहेत. साम, दाम, दंड, भेद वापरून राजरोस हा उद्योग केला जात आहे. कोणी विरोध करण्याची हिंमत करू नये, यासाठी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्नही वेळोवेळी केला जात आहे.

नागरिकांनी वाळू चोरी विरोधात आवाज उठवताच महसूल विभाग व पोलिसांनी वेळोवेळी कारवायाही केल्या आहेत. तरीही निर्ढावलेल्या तस्करांकडून वाळूच्या चोऱ्या सुरूच आहेत. यामागील वरदहस्त शोधण्याची गरज असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. याआधीही काही दिवसांपूर्वी मध्य रात्रीच्यासुमारास मोसम नदी पात्रातून होत असलेली वाळूची चोरटी वाहतूक रोखणाऱ्या वाडीपिसोळच्या पोलीस पाटील व सरपंचावर वाळू तस्करांनी दगडफेक करून दोघांना जखमी करण्याचा व दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. याचीच पुनरावृत्ती पुन्हा जायखेड येथे घडली आहे. मोसम नदी पात्रातून रात्री होत असलेली वाळूची चोरी रोखणाऱ्या तरूणांना वाळु तस्करांच्या दमबाजीचा व मदतीसाठी बोलावलेल्या पोलिसांच्या असहकार्याचा सामना करावा लागला. या संदर्भात विविध माध्यमातून आवाज उठवणाऱ्या व्यक्तींना पोलिसांनी नोटीस पाठवून जाब विचारला आहे. गुन्हेगारांना पाठीशी घालून 'चोर सोडून संन्याशाला फाशी' देण्याचा हा धक्कादायक प्रकार असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.

जायखेडा पोलिसांनी सामजिक कार्यकर्त्यांना नोटीसा देऊन त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्याचा नमुना समोर आला आहे. ही मुस्कटदाबी असून, लोकशाहीत हे अजिबात सहन केली जात नाही. यासंदर्भात महाराष्ट्र राज्याचे ग्रहमंत्री अनिल देशमुख, महाराष्ट्र राज्याचे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार दिलिप बोरसे, पोलीस अधीक्षक नाशिक, जिल्हधिकारी नाशिक, तहसीलदार बागलाण आदींकडे तक्रार करण्यात येईल, असे सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार गोसावी यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details