नाशिक - देशात महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यानंतर पहिल्यांदाच 1960 साली विधानसभेसाठी सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. या पहिल्या निवडणुकीपासून ते सोमवारी (21 ऑक्टोबर) झालेल्या 14 व्या विधानसभा निवडणुकीत, नाशिक मधील देवळाली मतदारसंघातून सखुबाई नामदेव चुंभळे या आजींनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
1960 पासून आजपर्यंत महाराष्ट्र विधानसभेच्या 14 निवडणुका झाल्या. पहिल्या निवडणुकीच्या वेळी आपण मतदानाचा हक्क बजावल्याचे सखुबाईंनी सांगितले. यानंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला असल्याचे त्या सांगतात. मतदान करणे ही सर्वाधिक आनंदाची गोष्ट असते, आपला तो हक्क आहे. हा हक्क बजावणे हे लोकशाहीच्या सुदृढीकरणासाठी आवश्यक असते. त्यामुळे न चुकता प्रत्येकवेळी मतदानाचा हक्क आपण बजावला. 14 व्या विधानसभेसाठी सोमवारी सकाळीच नातु विश्वास चुंभळे यांच्यासोबत गौळाणे येथील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर दाखल होत आपण मतदानाचा हक्क बजावल्याचे सखुबाईंनी सांगितले.