नाशिक - परतीच्या पावसाने जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील नगदी पिकाची नासाडी केली. त्यामुळे या भागातला शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर आले असता शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले.
अवकाळी पावसाचा हाहाकारामुळे राज्यातील शेतकऱ्यांवर संकटाचे सावट आहे. नाशिक जिल्ह्यातही अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावेळी, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे वडाळा भोई गावाच्या परिसरात द्राक्ष बागांची पाहणी करायला आले असतांना, आपल्या पिकांची झालेली नासाडी दाखवतांना शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले.
हेही वाचा - नाशिक जिल्ह्यात साडेतीन लाख हेक्टर पिकाचे नुकसान, विमा कंपन्यांना सहकार्य करण्याचे निर्देश
परतीच्या पावसाचा नाशिक जिल्ह्याला चांगलाच फटका बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात द्राक्ष, कांदा, भाजीपाला या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील 15 तालुक्यांपैकी सर्वाधिक नुकसान सटाणा, मालेगाव, नांदगाव, निफाड, येवला, चांदवड, सिन्नर आणि देवळा यापूर्वेकडील आणि मध्य नाशिकमधील तालुक्यांमध्ये झालेले आहे. तर, त्र्यंबक, दिंडोरी, नाशिक, इगतपुरी आणि कळवण या तालुक्यांमध्ये काही प्रमाणात नुकसान झालेले आहे. यात द्राक्षबागांचे सर्वाधिक नुकसान निफाड, बागलाण, दिंडोरी, नाशिक आणि चांदवड या तालुक्यांमध्ये झालेले आहे. येत्या आठ दिवसात पंचनामा पूर्ण करून मदत दिली जाणार माहिती सदाभाऊ यांनी दिली. तसेच पंचनामा करण्यास दिरंगाई झाल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.