दिंडोरी (नाशिक) - वणी पिंपळगाव रस्त्यावरील तिसगाव फाट्यावरील साई गजानन पेट्रोलपंप कोयत्याचा धाक दाखवून लुटल्याची घटना घडली. ही घटना मंगळवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या दरम्यान घडली. लुटीनंतर चोरटे मोटारसायकलवरुन पसार झाले.
नाशकात कोयत्याचा धाक दाखवून पेट्रोलपंपावरील रोकड लंपास या घटनेची मिळालेली माहिती अशी, की मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास पेट्रोलपंप लगतच्या कॅबीनजवळ दोन मोटरसायकलवर चार अज्ञात संशयीत आले. त्यांनी केबिनची काच फोडून आत प्रवेश केला. तेथे पेट्रोलपंपावरील कर्मचारी झोपलेले होते. मात्र, काच फोडण्याचा आवाज आल्याने ते जागे झाले. या चार चोरट्यांनी तेथे असलेल्या दोन कर्मचारी यांचेकडे पैशाची मागणी केली. पैसे देत नसल्याने त्यांना मारहाण केली. त्यानंतर कोयत्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. जीव वाचविण्याच्या भीतीने या दोन कर्मचाऱ्यांनी सोळा हजार पाचशे रुपये असलेली छोटी बॅग संशयीतांच्या हवाली केली. ही लुट करुन लुटारुंनी घटनास्थळावरुन पळ काढला.
कर्मचाऱ्यांनी घडलेल्या घटनेची माहीती पेट्रोलपंप मालकाला व पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या ठिकाणची पाहणी केली. तेथील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता हा सर्व प्रकार त्यात कैद झाला आहे. मात्र, रात्री ची वेळ व लाईट बंद असल्याने अंधुक प्रकाशात संशयीतांची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. तोंड कपड्याने झाकलेले असल्यामुळे केवळ शरिरयष्टी देहबोली व लुटमारीची पद्धत यावरुन तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी सदाशीव वाघमारे, सहाय्यक पोलीस निरिक्षक सागर शिंपी, स्थानिक गुन्हा शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. जबरी लुट केल्याप्रकरणी 25 ते 30 वयोगट असणाऱ्या संशयीतांनी ही लुट केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. देवीदास संपत चतुर या कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरुन चौघा संशयीतांविरोधात शस्त्राचा धाक दाखवून जबरी लुट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे करत आहे.