नाशिक- दिंडोरी तालुक्यातील कसबे वणी बसस्थानक परिसरातील महालक्ष्मी मोबाईल व ईलेक्ट्राॅनीक्स या दुकानातून शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोन संशयितांनी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. नवे तसेच दुरुस्तीसाठी आलेले भ्रमणध्वनी, होमथियेटर असा सुमारे दीड लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला.
दिंडोरीतील कसबे वणीत मोबाईल दुकानात चोरी; दीड लाखांचा ऐवज लंपास पोलीस सुत्राकडून मिळालेल्या माहीतीनुसार, बसस्थानकालगत ग्रामपालिकेच्या व्यापारी संकुलात जितेंद्र देवराज दुसाने यांचे दुकान आहे. रस्त्यालगत असलेल्या दुकानाच्या पहील्या मजल्यावर जाऊन छताचा पत्रा उघडुन संशयितांनी रात्री 12 च्या दरम्यान दुसाने यांच्या दुकानात प्रवेश केला. चेहऱ्याला मास्क, डोळ्यावर गॅागल, अंगात पांढरा रेनकोट असा पेहराव त्यांनी केला होता. चोरी केल्यानंतर मध्यरात्री 2 वाजून 18 मिनिटांनी त्यांनी तेथून पळ काढला. ही सर्व घटना सिसिटीव्हीमधे रेकार्ड झाली आहे.
हेही वाचा -'मुंबईच्या शेजारील जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणात आल्यास सर्वसामान्यांना ट्रेनमधून प्रवासाची मुभा'
दरम्यान, रविवारी सकाळी जितेन्द्र दुसाने नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यास आले असता, त्यांनी शटरसमोरील लोखंडी जाळी उघडली मात्र शटरला आतून खुर्चीचा आधार दिल्याने जोरदार धक्यानंतर शटर उघडले. दुकानातील पसारा पाहताच त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली व दुकानातील वस्तुंचा शोध घेतला असता, चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच माहीती पोलिसांना दिली. माहीती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. दुकानातून दोन होमथियेटर, भ्रमणध्वनी, चार्जर, बॅटरी, स्पीकर्स, हेडफोन तसेच जुने दुरुस्तीसाठी आलेले भ्रमणध्वनी असा एकूण दीड लाख रुपयांचा ऐवज चोरट्य़ांनी लांबविला आहे.
कसबे वणी बसस्थानक परिसर तसा गजबजलेला असतो. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाच वाजेनंतर दुकाने बंद करण्याचा प्रशासनाने घेतला आहे. याबद्दल माहिती संबधित चोरट्यांना असल्याने नियोजन आखून त्यांनी ही धाडसी चोरी केल्यामुळे व्यापारीवर्गात चिंतेचे वातावरण आहे.