नाशिक -इगतपुरी तालुक्यातील मुंबई आग्रा महामार्गावरील बोट-टेंभे येथे बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी एकाच वेळी तीन ठिकाणी दरोडा टाकला. दरम्यान दरोडेखोरांनी सोन्याच्या चोरीसाठी महिलेचा कान तोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ताईबाई आडोळे, असे जखमी महिलेचे नाव आहे.
दरोडेखोरांनी ताईबाई या महिलेला घरात घुसुन जबर मारहाण करीत तिचा कान तोडुन कानातील दोन झुबे, गळ्यातील मनचली हार पळवला. तर दुसऱ्या घटनेत शेजारीच राहणारे नवनाथ आडोळे यांच्या पाकीटातील सतराशे रुपये, तिसऱ्या घटनेत शिवाजी विठ्ठल आरशेंडे यांच्या घरातील कपाटातून सोळाशे रुपये व चार तोळे वजनाचे पायातील जोडवे चोरून नेले. यातील ताईबाई आडोळे यांना जबर मारहाण केल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना नाशिक येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.