नाशिक - अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या मुंबई पोलीस दलाच्या कर्मचाऱ्याला दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. गोरक्षनाथ उर्फ गोरख मधुकर शेखरे असे या आरोपी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. नाशिकच्या जिल्हा न्यायाधीश सुधा नायर यांनी ही शिक्षा सुनावली.
दिंडोरी येथे राहणारा आरोपी गोरक्षनाथ शेखरे हा भायखळा येथील पोलीस ठाण्यात कार्यरत होता. 2017 मध्ये तो सुट्टीसाठी दिंडोरी येथे घरी आला होता. त्याच्या घरा शेजारी राहणारी पीडिता घरासमोर भांडी घासत असताना त्याने तिला बाजूला येण्याचा इशारा केला. मात्र, मुलीने त्याच्याकडे लक्ष दिले नाही. याचा राग आल्याने आरोपीने तिला शेजारी असलेल्या एका बंद घराच्या बाथरूममध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.