नाशिक- केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदी निर्णयामुळे शेतकरी संकटात आला आहे. हा निर्णय अन्यायकारक आहे. यामुळे मुंबई, मद्रास, बांगलादेश सीमेवर माल पोहोचल्यानंतर थांबविण्यात आला आहे. हा माल एक्स्पोर्ट झाला नाही तर सडून जाईल. हा माल तत्काळ निर्यात करण्याची केंद्राने परवानगी द्यावी, अशी मागणी करत केंद्राच्या या निर्णयाविरुध्द रयत क्रांती शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल, असा इशारा अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.
'कांदा निर्यातबंदी उठविण्यासाठी राज्यभर आंदोलन करु'
केंद्राने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. यामुळे या निर्णयाविरोधात रयत क्रांती शेतकरी संघटनेकडून उद्यापासून विंचूर येथे आंदोलना सुरुवात करण्यात येणार आहे.
नाशिक दौर्यावर आले असता त्यांनी बुधवारी (दि. 16 सप्टें.) त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. निर्यातबंदी हा सुटाबुटातल्या अधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय आहे का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 5 जूनला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर मुक्त बाजारपेठाची घोषणा करतात. मुक्त बाजारपेठेमुळे शेतकरी आनंदी झाला होता. अवघ्या 3 महिन्यात ही घोषणा हवेत विरली. ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे.
उद्यापासून (दि. 17 सप्टें.) राज्यव्यापी आंदोलन करणार आहोत. आमचे आंदोलन, अत्यावश्यक वस्तू कायद्यातून शेतमाल वगळल्याला विरोध, केंद्र सरकारने, शेतकऱ्यांना एक देश एक बाजारपेठ हा शब्द पाळावा यासाठी आहे. आंदोलन अजून आक्रमक होणार. आम्हाला भीक नको न्याय द्या, अशी मागणी त्यांनी केली.
हेही वाचा -कांदा निर्यातबंदी तातडीने मागे घ्यावी; काँग्रेस आक्रमक