नाशिक- त्यांनी माझे नाव घेऊन आरोप करावेत. मी कोणती जमीन बळकावली हे सिद्ध करुन दाखवावे. लोकसभा निवडणूकीत पराभव झाल्याने ते काहीही बरळत आहेत, अशी नाव न घेता माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी टीका केली.
रावसाहेब दानवे, भाजप नेते हेही वाचा - नाशिकचा पारा @ 7 अंशापर्यंत; गुलाबी थंडीच्या आनंदासाठी सुरेल गाण्यांची मैफील
काही कार्यक्रमांनिमित्त नाशिक दौऱ्यावर आलेल्या दानवे यांनी भारतीय जनता पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले, साईबाबा जन्मस्थळाचा वाद हा जुनाच आहे. मात्र, आता निधी मंजूर झाला आणि त्यातून या घटना घडत आहेत. सरकारने त्वरित हा वाद थांबवावा, अशी मागणी केली. यासोबतच हे सरकार भाजपच्या अनेक प्रकल्पांना ब्रेक लावत आहे. त्यामुळे हे सरकार जास्त काळ न टिकणारे अमर, अकबर आणि अँथनीचे हे सरकार आहे, असे ते म्हणाले.
हेही वाचा -संतापजनक...अश्लील व्हिडिओ क्लिप दाखवून सहावीतील विद्यार्थिनीवर अत्याचार
केंद्र सरकारने नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा नागरिकत्व देण्यासाठीचा कायदा केला आहे. नागरिकत्व हिसकावण्यासाठी केलेला नाही. विरोधक याबाबत गैरसमज पसरवत आहेत. जनतेला लवकरच ते कळेल. उद्या मी काश्मीरला जाणार आहे. तेथील जनतेशी संवाद साधेन. त्यांच्या समस्या समजून घेऊन केंद्र सरकारला कळवेन. सरकारच्या ज्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या नाहीत त्या पोहोचविण्याचे काम आम्ही सुरू केले आहे. त्याचे निराकरण होईल, असा मला विश्वास आहे, असे दानवे म्हणाले.