नाशिक -ग्लोबल टिचर अवॉर्ड विजेते रणजितसिंह डिसले यांच्या परदेशात स्कॉलरशिपसाठी जाण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. याप्रकरणी राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. याशिवाय माझं सीईओंशी बोलणं झाले आहे. त्यांना स्कॉलरशिपसाठी आवश्यक ती परवानगी दिली जावी, त्यांना परदेशात पाठवायचं आहे, असे शिक्षणमंत्री डॉ. वर्षा गायकवाड यांनी इगतपुरी येथे स्पष्ट केले आहे.
ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक रणजित डिसले यांना अमेरिकेत पीएचडी मिळविण्यासाठी जाण्याचा मार्ग मोकळा झाला असून त्यांची रजा मंजूर केल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री डाॅ.वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
डिसले यांनी प्रोसिजर प्रमाणे अर्ज दिला नव्हता -
इगतपुरी येथे सुरु असलेल्या मुंबई काँग्रेसच्या चिंतन शिबिरात सहभागी होण्यासाठी वर्षा गायकवाड आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी माध्यमांना माहिती दिली. सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी शाळेचे ते शिक्षक आहेत. त्यांनी पीएच.डी साठी रजा अर्ज केला होता. त्यावरुन शालेय प्रशासनाशी त्यांचा सुरु असलेला वाद राज्यभर चर्चेचा विषय ठरला. डिसले सरांबाबत मी प्रशासनाशी बोलले आहे. त्यांना रीतसर परवानगी दिली जाईल. डिसले यांनी प्रोसिजर प्रमाणे अर्ज दिला नव्हता. आता त्यांना प्रक्रियाप्रमाणे कार्यवाही करत परदेशी जाण्याची परवानगी दिली जाणार आहे. डिसले यांना परवानगी देण्यासंदर्भात मी निर्देश दिले आहेत. तसेच डिसले सरांवर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी केली जाईल, असेही वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.
अमेरिकेत पीएचडीसाठी केली होती रजेची मागणी -
डिसले गुरुजी यांना अमेरिकेत पीएचडी करण्यासाठी जायचे असल्याने त्यांनी शिक्षणाधिकारी यांच्याकडे रजेची मागणी केली होती. मात्र तब्बल तीन वर्षे डिसले हे कामावर हजर नसल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असेही सांगण्यात आले होते. याबाबत माहिती मिळताच डिसले गुरुजी यांनी उद्विग्न होऊन राजीनामा देणार असल्याची प्रतिक्रिया दिली होती. या प्रकरणी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सर्व त्रुटी दूर करून उच्चशिक्षणासाठी परदेशात जाण्यासाठी डिसले गुरुजींना रजा मंजूर केल्याची माहिती दिली. डिसले गुरुजींना मागील वर्षी ग्लोबल टीचर अवार्ड देण्यात आल्याने जगभरातून त्यांचे कौतुक व अभिनंदन करण्यात आले होते.
ग्लोबर पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डीसले यांनी स्कॉलरशिपसाठी किंवा पीएचडीसाठी नियमानुसार अर्ज द्यावा, त्यावर विचार करू अशी माहिती शिक्षणाधिकारी डॉ. लोहार यांनी ईटीव्ही भारतशी फोनवर बोलताना दिली आहे. पीएचडी किंवा स्कॉलरशिपसाठी त्यांना आम्ही नियमानुसार यावे असे सांगितले होते. सर्व सविस्तर माहिती द्यावी असे सांगितले असताना देखील त्यांनी अर्थाचा अनर्थ केला आणि माध्यमांसमोर वेगळीच माहिती दिली, असे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी सांगितले आहे.