नाशिक - कोरोना विषाणूच्या सावटाखाली नाशिकमध्ये रंगपंचमीचा सण साजरा करण्यात आला. नाशिकच्या कलाकारांनी एकत्र येऊन शहरातील परशुराम सायखेडकर नाट्यगृहाबाहेर कोरड्या रंगाची रंगपंचमी साजरी केली.
नाशिकमध्ये कोरोना सदृश्य सहा रुग्णांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे नाशिककरांनी समाधान व्यक्त केले. नाशिकमध्ये होळीच्या पाचव्या दिवशी रंगपंचमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा कोरोनाच्या प्रभावामुळे नागरिकांनी म्हणावा तसा सहभाग घेतला नाही. मात्र, कलाक्षेत्रातील व्यक्तींनी एकत्रित येत परशुराम सायखेडकर नाट्यगृहाबाहेर कोरड्या रंगाची रंगपंचमी खेळत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी संगीत, नृत्य, नाटक, चित्रपट लेखन-दिग्दर्शन, चित्रकला, गायन या क्षेत्रातील व्यक्ती एकत्र आल्या होत्या.