नाशिक : नाशिक शहरातील तिवंधा चौक, शनी चौक, गाडगे महाराज पूल आणि जुनी तांबट गल्ली अशा चार ठिकाणी पेशवेकालीन रहाड रंगोत्सव साजरा केला जातो. नाशिक मध्ये 250 वर्षांपासूनची रहाड परंपरा आजही कायम आहे. रंगपंचमीला अवघा एक दिवस शिल्लक असल्याने, शहरात असणाऱ्या चार ठिकाणच्या बुजवलेल्या रहाडी खुल्या करून; त्याची साफसफाई आणि डागडुजी करण्यास प्रारंभ झाला आहे. 25 बाय 25 फुटांचा चौरस आणि साधारणपणे 10 ते 12 फुटांची खोली असलेल्या हौदात नैसर्गिक फुलांपासून तयार केलेले रंग टाकले जातात आणि रंगपंचमीच्या दिवशी दुपारी 2 वाजेनंतर या रहाडीची पारंपरिक पूजा करून; नाशिककर नागरिक या रहाडीत उडी मारून रंगोत्सव साजरा करतात.
नैसर्गिक रंगांचा वापर : या राहाडीत नैसर्गिक फुलांपासून तयार केलेले रंग टाकले जातात. ज्यामुळे त्वचा रोग होत नाही. तसेच उन्हाळ्यात ऊन बाधत नाही, अशीही आख्यायिका आहे. त्यामुळे आबालवृद्धांपासून युवकांची इथं रंग खेळण्यासाठी प्रचंड गर्दी होत असते. यात शनिचौक, पंचवटी येथे गुलाबी रंगाची रंगपंचमी खेळली जाते. गाडगे महाराज पुलाजवळ पिवळा रंगाने रंगपंचमी खेळली जाते. रोकडोबा तालीम संघ, मधळी होळी तालमी जवळ केशरी-नारंगी रंगाने होळी खेळली जाते, असे याचे वैशिष्ट आहे. रंग विविध प्रकारच्या वनस्पतीच्या फुलांपासूनतयार केला जातो. त्या फुलांना सुमारे दोन तास एका मोठ्या भांड्यात टाकून उकळविले जाते. या रंगात हजारो मंडळी यात उड्या मारून आनंद साजरा करतात. संपूर्ण नाशिक शहरात आधी 17 राहाडी अस्तित्वात होत्या, आता त्या 3 आहेत. अगोदर या रहाडी पेशवे सरदारांच्या अखत्यारीत होत्या. आणि आता या रहाडी तालीम संघांच्या अखत्यारित आहेत.