येवला - लॉकडाऊन सुरू असल्याने हातावर पोट असलेल्या गरिबांचा रोजगार हिरावला आहे. रोजगाराअभावी त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी नाशिकमधील येवला येथील स्वर्गीय रामनारायण काबरा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गरजूंना दररोज दोन वेळचे भोजनाचे पाकीट वाटप केले जाते. गरजू , निराधार, बेघरांसाठीही ट्रस्ट नेहमीच मोठा आधार ठरत आहे.
दीड वर्षांपासून मोफत जेवण
शहरातील विधवा, निराधार गोरगरिबांच्या जेवणाची परवड लक्षात घेता ट्रस्टच्या वतीने सुमारे दीड वर्षापासून भोजनाचे मोफत पाकीट वाटप उपक्रम सुरू आहे, आजही तो अविरतपणे सुरू आहे. दररोज सकाळ व संध्याकाळी ताजे व गरम जेवण गरजूंना मिळत आहे. त्यामुळे जेवणाची होणारी परवड काही प्रमाणात थांबली आहे.