नाशिक -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्याऐवजी कायद्याचा अभ्यास करावा, असे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. शेतकरी आंदोलनाला राजकीय वळण लागले असल्याचे म्हणत शेतकऱ्यांना त्रास देणे थांबवावे, असे आठवले यांनी नाशिकच्या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
कृषी कायद्याला कोर्टाने दोन वर्षाची स्थगिती दिली असून केंद्र सरकारने ही कोर्टाच्या निर्णयाचा आदर करत पुढील दोन वर्षे हे कायदे लागू करणार नाही, असे म्हटले असताना शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले पाहिजे, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री आणि शरद पवार यांनी आंदोलनाला पाठिंबा देण्याऐवजी कायद्याचा अभ्यास करावा. पवार साहेबांचा अभ्यास मोठा असून त्यांनी मध्यस्थी करावी, असे देखील आठवले यांनी सांगितलं.
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही भूमिका
मराठा आरक्षण मुद्दा कोर्टात आहे. आर्थिक मागास सर्वांना आरक्षण दिले पाहिजे. तेलंगणा धर्तीवर मराठा समाजाला आरक्षण नको त्यांना स्वतंत्र आरक्षण पाहिजे आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही माझी भूमिका आहे, असे रामदास आठवले यांनी सांगितलं. औरंगाबाद नामांतराला आमचा विरोध नाही पण औरंगाबाद एअरपोर्टला अजिंठा एलोरा नाव दिले पाहिजे, त्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल असेही आठवले यांनी सांगितलं.
हे धनंजय मुंडेचं लफडं.
त्या महिलेने आपले धनंजय मुंडे यांच्यावर लावलेले आरोप मागे घेतले आहेत. बहुतेक त्यांच्या दुसऱ्या पत्नीने आपल्या बहिणीला समजावले असेल. आम्ही कोणाची बदनामी करत नाही. मात्र यातून धनंजय मुंडे यांचं दुसरे लग्न समोर आले आहे. मात्र एका माणसाने दोन लग्न करू नये, असे माझे मत असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितलं.