नाशिक- सीएए मुद्यावरून मुस्लीम व दलितांमध्ये गैरसमज पसरवला जात आहे. या मुद्यावरून काँग्रेस मुस्लिमांना भडकविण्याचे काम करत आहे. दिल्लीमध्ये जी दंगल घडली त्यामागे काँग्रेस व आम आदमी पक्षाचा हात असल्याची शंका आहे. या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.
'दिल्ली हिंसाचारामागे काँग्रेसचा हात?'... हेही वाचा-कोरोना व्हायरसच्या भीतीपोटी मृत कोंबड्या फेकल्या नाल्यात, दूषित झालेल्या पाण्यामुळे विदेशी पक्षांचाही मृत्यू
सीएए व एनआरसीला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले. काळाराम सत्याग्रह अभिवादनासाठी नाशिकमध्ये आले असता त्यांनी विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला.
सीएए कायद्यामुळे दलित अडचणीत येणार नाहीत...
दिल्ली घटनेचे देशात इतरत्र पडसाद उमटले नाहीत, ही चांगली बाब आहे. मुस्लिमांनी सीएए कायदा समजून घ्यावा. सीएए कायद्यामुळे दलित अडचणीत येणार नाहीत. देशात काही ठिकाणी दलितांवर अत्याचार होत आहेत. मात्र, पूर्वीपेक्षा दलितांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये घट झाली आहे. पंंतप्रधान मोदी हे संविधानात बदल करतील, हा अपप्रचार सुरू आहे. ते संविधानाला धर्मग्रंथ मानतात, असे सांगत मोदी ‘सबका साथ सबका विकास’ या धोरणानुसार काम करत असल्याचे ते म्हणाले.
16 मेला नाशिक शहरात पक्षाचे अधिवेशन...
देशात जनणगना होणार असून ती ओबीसी, मराठा, दलित अशी जातनिहाय झाली पाहीजे, अशी मागणी त्यांनी केली. नवबौध्दांना सवलती दिल्या जात नाहीत. याबाबत कायद्यात बदल करावा, यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, पुढील 16 मेला नाशिक शहरात पक्षाचे अधिवेशन घेणार असून त्यास भाजप नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांना बोलविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उध्दव ठाकरे यांना ऑफर..
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे माझे चांगले मित्र आहेत. मात्र, हे सरकार जास्त दिवस टिकणार नाही, असे सांगत मागील सरकारच्या निर्णयांना स्थगिती देण्याचे काम जोरात सुरू असल्याची टीका त्यांनी केली. बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उध्दव ठाकरे यांनी भाजपसोबत यावे, अशी ऑफर त्यांनी आठवले यांनी दिली.