नाशिक - येथे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी घरोघरी लाडक्या गणपती बाप्पांसोबत गौराईचे उत्साहात आगमन झाले. ह्यावेळी अनेक ठिकाणी भक्तांनी घरात आकर्षक विद्युत रोषणाई करत वेगवेगळे आरास साकारले आहेत. यातच नाशिकच्या महात्मानगर भागात राहणारे लक्ष्मण सावजी यांनी घरात राम मंदिराची भव्य आरास साकारली आहे.
गौराईसमोर अयोध्येतील श्री राम मंदिराची भव्य आरास समस्त मराठी मनाचं लाडकं दैवत असल्येल्या गणरायांच्या सुखद आगमनानंतर मंगळवारी गौराईचेही आगामन झाले. ह्या काळात अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी महिला व्रतवैकल्ये करतात. भाद्रपद मासात येणाऱ्या गौरींचे पूजन वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते. गणपती पाठोपाठ गौराईचेदखील सोन पावलांनी आगमन होते. त्यांच्या स्वागतासाठी महिला घराघरात जय्यत तयारी करतात. त्याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या लक्ष्मण सावजी यांनी राम मंदिराची भव्य आरास साकारली आहे.
सध्या कोरोनामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. अनेकांचा दैनंदिन क्रम विस्कटला आहे. त्यातच आधी अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाचा मुद्दा यावर्षी मार्गी लागला असून या कठिण काळात ही दिलासा देणारी बातमी आहे. त्यामुळे, गणेशोत्सवात आपण मंदिराची आरास साकारल्याचे सावजी म्हणाले. तसेच, जगावर आलेलं हे कोरोनाचं मोठ संकट देवाने लवकर दूर करावं आणि शांतता प्रस्थापित करावी, अशी देवाकडे मागणी केल्याचेही सावजी यांनी सांगितले.
यावेळी घरोघरी सुबक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. अनेक ठिकाणी सोन्या चांदीचे तर काही ठिकाणी पितळी मुखवटे आणून गौरीचा साजशृंगार करण्यात आला होता. याशिवाय सोळा प्रकारच्या भाज्या, डांगराची फुले, कमलपुष्प, वेणी यासोबत फराळाचे पदार्थ नैवेद्य म्हणून ठेवण्यात आले होते.
हेही वाचा -ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या पाल्यांवर 'अशी' ठेवा नजर