महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध, मालेगाव शहरासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करणार' - corona patient in nashik

आरोग्य सुविधेसह नागरिकांच्या सर्व अडचणी सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध असून नागरिकांनी संयम बाळगावा, असे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांना केले. कोविड-19 व्यतिरिक्त इतर आजार असलेल्या रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी विशेष काळजी घेण्यात येणार असल्याचे सांगत मंत्री टोपे म्हणाले, येत्या दोन दिवसात 'फिवर क्लिनीक' सुरु करण्यात येईल.

आरोग्य मंत्री राजेश टोपे
आरोग्य मंत्री राजेश टोपे

By

Published : Apr 30, 2020, 7:46 AM IST

Updated : Apr 30, 2020, 10:59 AM IST

नाशिक- कोरोना विषाणूचे थैमान रोखण्यासाठी शासन स्तरावरुन मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरु आहेत. अशात मालेगाव शहरातील रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक असून यासाठी मालेगावातील रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्य सुविधेसह नागरिकांच्या सर्व अडचणी सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध असून नागरिकांनी संयम बाळगावा, असे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांना केले.

मालेगाव शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री ना.दादाजी भुसे, आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल, महापौर ताहेरा शेख, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) डॉ.आरती सिंग यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना टोपे म्हणाले, इन्स्टीट्यूशनल क्वारंटाईनसाठी आवश्यक सोयीसुविधांमध्ये स्वच्छ पाणी, पोषक आहार, स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेसह तज्ज्ञ डॉक्टरांची टीम, त्यांच्यासाठी लागणाऱ्या पीपीई किट व पुरेसा औषधसाठा या सर्व आवश्यक बाबींची पूर्तता करण्यात येईल. नाशिकमध्ये तपासणी लॅब कार्यान्वित झाल्यामुळे दररोज 200 चाचण्या करण्याची सोय उपलब्ध झाली आहे. यापुढे 24 तासात अहवाल प्राप्त होणार असल्यामुळे रुग्णांवर तत्काळ उपचार मिळतील. परिणामी रुग्णांची घरवापसी मोठ्या प्रमाणात होवू शकेल, असेही त्यांनी सांगितले.

खासगी रुग्णालये तत्काळ कार्यान्वित करा -

मालेगाव शहरात जवळपास 150 खासगी रुग्णालये आहेत. ती तत्काळ सुरू करण्याचे आवाहन टोपे यांनी केले. ते म्हणाले, रुग्ण डॉक्टरांमध्ये देव शोधत असताना डॉक्टरांनी रुग्णालय बंद करून घरात बसणे योग्य नाही. कोविड-19 व्यतिरिक्त इतर आजार रुग्णांची हेळसांड होणार नाही, यासाठी सर्व खासगी डॉक्टरांनी त्यांच्या ओपीडी तत्काळ कार्यान्वित कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले. यासोबतच शहरातील किमान चार ते पाच खासगी रुग्णालयात थोडीफार लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांसाठी सोय उपलब्ध करुन त्यांनादेखील पीपीई कीट पुरवण्यात येतील, असेही टोपे यावेळी म्हणाले.

मालेगाव शहरासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करणार

येत्या दोन दिवसात 'फिवर क्लिनीक' सुरू करणार -

कोविड-19 व्यतिरिक्त इतर रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी विशेष काळजी घेण्यात येणार असल्याचे मंत्री टोपे यांनी सांगितले. 'येत्या दोन दिवसात 'फिवर क्लिनीक' सुरु करण्यात येईल. त्याचबरोबर सामान्य रुग्णालय नॉन कोवीड करण्यात आले असून तेथील परिस्थितीचाही आढावा घेतला आहे. तिथे आवश्यक सुविधेसह डॉक्टर्स, नर्सींग स्टाफसह स्वच्छता कर्मचाऱ्यांची उपलब्धता तात्काळ करुन देण्यात येईल,' असेही ते म्हणाले.

आपल्या सर्व समस्या सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध असून शासनामार्फत देण्यात आलेला प्रोटोकॉल तसेच सूचनांचे प्रत्येक नागरिकाने काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. आज आपल्यावर ओढवलेल्या परिस्थितीत आपसातील मतभेद बाजूला सारून एकत्रितपणे सामाजिक संकटाचा सामना करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Last Updated : Apr 30, 2020, 10:59 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details