नाशिक- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यंदाची लोकसभा निवडणूक लढवणार नाही, हे जाहीर केले आहे. त्यामुळे आज मुंबईमध्ये होणाऱ्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलतात, याकडे मनसे कार्यकर्त्यांसोबतच भुजबळांचेही लक्ष राहणार आहे. कारण, नाशिक लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ निवडणूक रिंगणात आहेत. तर, नाशकात मनसेचेही काही प्रमाणात प्राबल्य आहे.
मुंबईत राज ठाकरेंची तोफ धडाडणार; सभेकडे नाशिककरांसह भुजबळांचेही लक्ष
मुंबईत आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची तोफ धडाडणार.... नाशकात मनसेचे प्राबल्य असल्याने ठाकरेंच्या सभेकडे भुजबळांचेही लक्ष... राष्ट्रवादीला पाठिंबा जाहीर करण्याचीही शक्यता
या निवडणुकीत मनसे, राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देणार असे काही प्रमाणात निश्चित झाले आहे. त्यामुळे, राज ठाकरे हे प्रचारात स्वतः उतरणार की मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना सूचना देणार याची उसुक्तता सर्वांना लागली आहे.
2004 मध्ये नाशिकमध्ये भुजबळांचा जोर होता -
2009 मध्ये मनसेचे वादळ नाशिकमध्ये धडकले आणि राज यांनी एकट्याच्या जोरावर नाशिकमध्ये ३ आमदार आणि ४० नगरसेवकांसह महानगरपालिकेवर मनसेचा झेंडा फडकवला. तसेच 2009 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवाराला चांगलीच टक्कर दिली. यावेळी गोडसेंना दुसऱ्या पसंतीचे मते मिळाली होती. मात्र, राज यांची जादू पुढच्या निवडणूकीत चालू शकली नाही, आणि 2014 मध्ये मोदी लाटेमुळे मनसेला नाशकात मोठा फटका बसला. यानंतर अनेक नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मनसेची साथ सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला. मात्र, असे असले तरी राज ठाकरे यांना मानणारा मोठा युवा वर्ग नाशिकमध्ये आहे. याची कल्पना भुजबळांनादेखील आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी छगन भुजबळांनी सहकुटुंब राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली होती.
यंदाच्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये आघाडीच्या एखाद्या व्यासपीठावर येऊन नाशिककरांना आवाहन केले तर त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार समीर भुजबळ यांना होऊ शकतो. तसेच नाशिकमधील मनसेची संघटना आणि नेटवर्क आघाडीच्या उमेदवाराला फायदेशीर ठरेल. त्यामुळे आज मुंबईत होत असलेल्या राज ठाकरे यांच्या सभेत ते काय भूमिका घेतात याकडे समस्त नाशिककरांचे लक्ष लागले आहे.