नाशिक- जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे नाशिक-मुंबई रेल्वे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. नाशिकच्या जवळील रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती.
जोरदार पावसामुळे नाशिक मुंबई रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. इगतपुरी घोटी दरम्यान जोरदार पाऊस झाल्याने अस्वली स्थानक परिसरात रेल्वे ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे मुंबईहून नाशिककडे येणाऱ्या डाऊन मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. यात गोदावरी, सेवाग्राम नागपूर अशा बहुतांश गाड्या इगतपुरी, घोटी रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आल्या होत्या. डाऊन मार्गावरील रेल्वे वाहतुकीला देखील पावसामुळे फटका बसला.
हेही वाचा - आपटेपाडा-दरा शिवारातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी करावा लागतो जीवघेणा प्रवास
मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या या लासलगाव, चाळीसगाव, नाशिक रोड, देवळाली कॅम्प या स्थानकात थांबविण्यात आल्यात. रात्री उशिरापर्यंत या लाईनवरील वाहतूक पूर्वपदावर येऊ शकली नाही. तसेच पंचवटी एक्सप्रेस देखील नाशिकच्या दिशेने उशिराने धावली. त्यासोबतच कानपूर गाडी नाशिक रेल्वे स्थानकात तर, तपोवन एक्सप्रेस देवळाली, कामायनी एक्सप्रेस लासलगाव तर वाराणसी, हरिद्वार या दोन्ही गाड्या चाळीसगाव रेल्वे स्थानकात थांबविण्यात आल्या होत्या. एकूणच बुधवारच्या जोरदार पावसामुळे रेल्वेचे वेळापत्रक तर कोलमडलेच सोबतच रेल्वे प्रवाशांनाही याचा फटका बसल्याचे दिसून आले.
हेही वाचा - नाशिकच्या पूनम सोनुनेला राष्ट्रीय अॅथेलेटिक स्पर्धेत सुवर्णपदक