मनमाड(नाशिक)-उत्तर भारताचे प्रवेशद्वार म्हणून ओळख असणाऱ्या मनमाड जंक्शन स्थानकावर तब्बल अडीच महिन्यानंतर रेल्वे वाहतूक सुरू झालीय. रेल्वेने सुरू केलेल्या २०० गाड्यापैकी जवळपास १९ गाड्या मनमाड स्थानकावरून ये जा करण्यास सुरवात झाली आहे.त्या गाड्यामधून प्रवासी येण्या आणि जाण्यास सुरुवात झालीय. मनमाड मधून बाहेर जाणाऱ्या प्रवाशांना आता प्रवासाच्या किमान दीड तास अगोदर रेल्वे स्थानकावर येणे बंधनकारक असून आल्यानंतर त्यांचे मेडिकल चेकअप करणे व सामान सॅनिटायझ करूनच त्यांना स्थानकावर प्रवेश देण्यात येत आहे.यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत होणार आहे.
भारताच्या टॉप १०० रेल्वे स्थानकाच्या सूचित स्थान असलेले मनमाड हे रेल्वेचे मोठे जंक्शन स्थानक आहे. येथून दररोज जवळपास १५० च्या वर प्रवासी गाड्या ये जा करतात.यातून हजारो प्रवासी देखील प्रवास करतात.अनेकांना शिर्डी,शनिशिंगणापूर, औरंगाबाद मनमाड येथील गुरुद्वारा आदी ठिकाणच्या धार्मिक स्थळांवर जाण्यासाठी हे महत्वाचे आणि अत्यंत सोयीचे स्थानक आहे. त्यामुळे या स्थानकास विशेष महत्व आहे.
रेल्वे प्रशासनाने जवळपास २०० प्रवासी गाड्या सुरू केल्या आहेत.यापैकी १९ गाड्या या मनमाड स्थानकावर थांबून जाणार आहेत.या गाड्यामधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रवास करण्यासाठी किमान दीड तास अगोदर रेल्वे स्थानकावर येणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रवासाचे तिकीट आरक्षित असले तरच सध्या स्थानकावर प्रवेश दिला जात आहे.
स्थानकावर जाण्याआधी प्रवेशद्वारावरच लावण्यात आलेल्या मेडिकल चेकअप केंद्रावर प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग करण्यात येत असून आजारी असल्यास प्रवास करणाऱ्यास मनाई करण्यात येत आहे. प्रवाशांच्या साहित्यावर सॅनिटायझर मारून ते निर्जंतुकीकरण करूनच प्रवास करण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे.याठिकाणी रेल्वे सुरक्षा बलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.