नाशिक -नाशिक रोड रेल्वे स्थानकात लोहमार्ग पोलिसांची सतर्कता पुन्हा एकदा समोर आली आहे. धावत्या रेल्वेत चढताना वृद्ध प्रवाशी पायरीवरून पाय घसरून चाकाखाली जात होता. यावेळी पोलिसांनी धाव घेत बाहेर ओढून त्याचा जीवा वाचवला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.
नाशिक रोड रेल्वेस्थानकावर रियाज शेख या रेल्वे प्रवाशासाठी लोहमार्ग पोलीस देवदूत ठरले. गोदान एक्स्प्रेस नाशिक रोड रेल्वे स्थानकात दाखल झाल्यावर रियाज शेख पाण्याची बाटली घेण्यासाठी रेल्वे स्थानकावर उतरले. काही वेळातच रेल्वे सुरू झाल्याने शेख यांनी चालती रेल्वे पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र पायरीवरून त्यांचा पाय घसरला. यामुळे ते खाली पडले. पायरी आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकून रेल्वेच्या चाकाखाली जाऊ लागले. तेवढ्यात ही बाब स्थानकावर कार्यरत असलेले लोहमार्ग पोलीस कर्मचारी इम्रान कुरेशी आणि राकेश शेडमाके यांच्या लक्षात आली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता धावत जाऊन रेल्वेच्या चाकाखाली जात असलेल्या शेख यांना मोठ्या हिंमतीने बाहेर ओढून काढले. या घटनेत शेख यांच्या हाताला आणि पायाला किरकोळ जखमा झाल्या. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. या घटनेचा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. वृद्ध प्रवाशाचे प्राण वाचवणारे लोहमार्ग पोलीस कर्मचारी कुरेशी, शेडमाके यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
प्रवाशांनी काळजी घ्यावी