नाशिक - लॉकडाऊनमुळे मनमाड लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडणाऱ्या गुन्ह्यांना ब्रेक लागला आहे. मागील चार महिन्यांत एकही गुन्हा घडला नसल्याचे पोलीस ठाण्यामार्फत समोर आले आहे. त्यामुळे मनमाड रेल्वे पोलीस स्टेशन हद्द लॉक डाऊनच्या निमित्ताने गुन्हेगारी मुक्त झाल्याचे चित्र आहे.
मनमाड जंक्शन हे भुसावळ डिव्हिजनचे महत्वाचे रेल्वे स्थानक आहे. या ठिकाणाहून दररोज 150 पेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या रेल्वे गाड्याची ये-जा होते. त्यातून हजारो प्रवासी प्रवास करत असतात. त्यामुळे धावत्या गाडीत बॅग चोरी, प्रवाशांना मारझोड करणे, सोनसाखळी चोरी, मोबाइल चोरी यांसह दरोड्यांचे देखील गुन्हे घडतात.वर्षाकाठी जवळपास एक हजारापेक्षा जास्त गुन्ह्यांची नोंद या रेल्वे पोलीस ठाण्यात होते. मात्र कोरोना सुरू झाल्यानंतर लॉकडाऊन करण्यात आले. यादरम्यान रेल्वेची प्रवासी वाहतूत पूर्णतः बंद झाल्याने मागील चार महिन्यांत एकही गुन्हा दाखल झाला नसल्याचे लोहमार्ग पोलीस निरीक्षक एन.के.मदने यांनी सांगितले.