नाशिक- दादा कांदा मागू नका राव...लय महाग झालाय, असे शब्द सध्या अनेक हॉटेलमध्ये ऐकायला मिळतात. कांद्याच्या भावाने शंभरी पार केल्याने नाशिकच्या हॉटेल व्यावसायिकांना कांदा परवडत नसल्याने हॉटेलमधून कांदा गायबच झाला आहे असेच म्हणावे लागेल. त्यामुळे कांद्याऐवजी आता ग्राहकांना मुळा आणि कोबीवर समाधान मानावे लागत आहे. कांद्याची जागा सध्या कोबी आणि मुळ्याने घेतली आहे.
भाव वाढल्याने नाशिकच्या हॉटेलमधून कांदा गायब हेही वाचा - कांद्याने सामान्यांच्या डोळ्यात आणले पाणी, राज्यात कांद्याचे दराने गाठला उच्चांक
आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून नाशिक जिह्याची ओळख आहे. मात्र, बाजारपेठेत कांद्याची आवक कमी झाल्याने कांद्याने शंभरी पार केली आहे. याचा परिणाम नाशिकच्या हॉटेल व्यवसायावर झाला आहे. हॉटेलमधून कांदा गायब झाला असून ग्राहकांना कांद्याऐवजी मुळा आणि कोबीवर समाधान मानावे लागत आहे.
भारतीय अन्नपदार्थात कांदा महत्त्वाचा मानला जातो. त्यात महाराष्ट्रातील खाद्यपदार्थात कांद्या महत्वाचा घटक आहे. मात्र, याच कांद्याने शंभरी पार केल्याने हॉटेलच्या खाद्यपदार्थांसोबत आता कांदा मिळत नाही. हॉटेल चालकांना देखील वाढलेल्या कांद्याच्या दरामुळे कांदा घेणे परवडत नसून हॉटेलच्या आर्थिक गोष्टींवर मोठा परिणाम पडत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
हॉटेल चालक हे ग्राहकांची नाराजी दूर करण्यासाठी कांद्याऐवजी कोबी आणि मुळा देऊन ग्राहकांचे समाधान करत आहेत. नाशिक जिल्ह्यात झालेल्या अवकळी पावसामुळे शेती पिकांसह कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी बाजारात कांद्याच्या मागणीच्या तुलनेत आवक घटली असल्याने कांद्याच्या भावाने उच्चांक गाठला आहे. कांद्याने जेवढं शेतकऱ्यांना रडवलं तेवढंच आता ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. त्यामुळे शासनाकडून शेतकऱ्यांना मदतीसोबतच ग्राहकांच्या खिशाचा देखील विचार करून कांद्याचे भाव नियंत्रणात आणावे, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत.