नाशिक -पबजी गेम्ससारखे हिंसक मोबाईल गेम्स मुलांसाठी ड्रग्सच आहेत. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत नाशिक येथील विद्यार्थी मानसोपचार तज्ज्ञसचिन उषा विलास जोशी यांनी व्यक्त केले.
पबजी गेमबद्दल माहिती देताना विद्यार्थी मानसोपचार तज्ज्ञ सचिन उषा विलास जोशी नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी एक अल्पवयीन मुलगा पबाजी गेम खेळण्यात व्यग्र होता. त्यामुळे त्याच्या आईने त्याच्या जवळचा मोबाईल काढून घेतला. त्यांनंतर विषारी औषध घेऊन त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. अशाचप्रकारे पबजी गेमच्या आहारी गेलेल्या मुलांसाठी दक्षिण कोरियामध्ये कौन्सलिंग सेंटर उघडले आहे. तेथील प्रत्येक शाळेत मानसोपचार तज्ज्ञाद्वारे समुपदेश केले जाते. सध्या घडणाऱ्या घटनांवरून अशीच परिस्थिती भारतामध्ये येणार असल्याचे सचिन जोशी सांगतात.
एका सर्व्हेनुसार प्राथमिक शाळेपासून १८ वर्षापर्यंत एखादा विद्यार्थी जेवढा वेळ शाळेत घालवतो. त्यापेक्षा जास्त वेळ विद्यार्थी व विध्यार्थीनी स्मार्टफोन आणि टीव्हीवर घालवत असल्याचे समोर आले आहे.
काय आहे पबजी गेम?
पबजीसारखे गेम हिंसात्मक असतात. या गेममध्ये १०० खेळाडू एका बेटावर शस्त्र वापरून इतरांशी लढाई करतात. एकमेकांना मारून स्वतःला वाचवायचे असते. जो जिवंत राहतो तोच जिंकत असतो.
यांसारख्या गेमने विद्यार्थ्यांच्या मेंदूमध्ये सातत्याने दुसऱ्याला मारण्याचे प्रोग्रामिंग होते. गेम खेळताना आनंद मिळत असतो. मात्र, तसे झाले नाहीतर तरुण वेडापिसा होतो. हिंसक बनत जात असल्याचे जोशी सांगतात.
पालकांनी काय करावे?
- मुलांना मोबाइलवर गेम खेळण्याची सवय लावू नये आणि मुलांचा याबाबतचा हट्ट पुरवून नये.
- मुले मोबाइलवर काय बघतात? कुठला गेम खेळतात? हे डोळ्यात अंजन टाकून पाहावे.
- मुलांना वयाच्या १८ वर्षापर्यँत स्मार्ट फोन देऊ नये
- स्मार्ट फोन दिल्यास त्याचा वापर आणि नियंत्रण पालकांच्या देखरेखी खाली आणि कडक शिस्तीत ठेवावे.
- मुलांना मैदानावर खेळू द्यावे तसेच विविध क्रियांमध्ये गुंतवून ठेवावे.