नाशिक - भाजप सरकार सारखे भ्रष्टाचारी सरकार आत्तापर्यंत महाराष्ट्रात कधीच नव्हते. त्यांचे सर्व भ्रष्टाचार आम्ही आता हळूहळू बाहेर काढणार आहोत, असे वक्तव्य काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. गांधी शांती यात्रेदरम्यान नाशिकमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.
भाजप नेते वैफल्यग्रस्त झाले असून, काहीही विधान करत आहेत. असे म्हणत, तुमच्याकडे बहुमत होतं तर राजरोसपणे शपथविधी करायचा होता, चोरून-लपून का केला? भाजप सरकार सारखे भ्रष्टाचारी सरकार आत्तापर्यंत महाराष्ट्रात कधीच नव्हते. भाजप सरकारचे सर्व भ्रष्टाचार आम्ही आता हळूहळू बाहेर काढणार आहोत, असा इशारा त्यांनी भाजपला दिला आहे.
नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत सरन्यायाधीश यांची भूमिका अयोग्य..
देशामधील हिंसाचार थांबत नाही तोपर्यंत नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या याचिकेवर सुनावणी होणार नाही, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी व्यक्त केले होते. यावर चव्हाण यांनी टीका केली असून, हिंसाचार आम्ही नाही तर भाजपचे गुंड करत आहेत. सरन्यायाधीश यांचे काम खटल्यावर सुनावणी करण्याचे असून, त्यांची ही भूमिका अयोग्य असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे.
तसेच, जस्टिस लोया यांच्या प्रकरणाबाबत ज्या शंका आहेत त्यांचे निरसन झाले पाहिजे, आणि न्याय्य पद्धतीने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, असेही ते यावेळी म्हणाले.'