नाशिक - सटाणा तालुक्याला पुनंद धरणातून पाणी देण्याला विरोध नसून ते पाणी पाईपलाईन ऐवजी कालव्याद्वारे देण्यात यावे, अशी मागणी, खा. डॉ. भारती पवार यांनी प्रशासनाला केली आहे. या संदर्भात पुनंद धरणावर बैठक घेण्यात आली.
पुनंद धरणातून पाईपलाईनऐवजी कालव्याने पाणी देण्याची मांगणी करतांना खा. डॉ. भारती पवार या बैठकीत भारती पवार, आमदार जे .पी .गावित, जि. प. सदस्य नितीन पवार जलवाहिनी विरोध संघर्ष समितीचे अध्यक्ष देविदास पवार तसेच कळवण, सटाणा, देवळा तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुनंद धरणातून पाणी पाईपलाईन नेण्यास विरोध नसून पाणी हे कालव्याद्वारे नेण्यात यावे. पुनंद पाण्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी सर्वांची असल्याने वेळ प्रसंगी सरकार विरोधात लढाई करून जलवाहिनी योजनेला विरोध केला जाईल, अशी महत्त्वपूर्ण भूमिका सर्वपक्षीय लोकप्रतिनीधींनी या बैठकीत घेतली.
या संदर्भात पूढे बोलताना खा. भारती पवार म्हणाल्या, की सटाणा शहराला पाणी देण्यास विरोध नसून पाणी कालव्याद्वारे घेऊन ठेगाडा पाझर तलावात टाकून ते सटाणा शहरासाठी कमी खर्चात देण्याचा पर्याय उपलब्ध आहे. परंतु 55 कोटी रूपये खर्च करण्याचा अट्टाहास कशासाठी होत आहे, असा प्रश्न त्यांना या वेळेस उपस्थित केला. सटाणा शहराला पाण्याची गरज आहे. पाईपलाईनने पाणी नेण्याचा अट्टाहास सोडला तर लवकर सटाणा तालुक्याचा पाणि प्रश्न मिटणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पुनंद प्रकल्पावर अभोणा पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलीस प्रशासनाच्या भूमिकेबद्दल जि. प सदस्य नितीन पवार यांनी आक्षेप घेतला. जलवाहिनी विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष देविदास पवार यांनी उच्च न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे सांगून, न्यायालयीन प्रक्रिया संदर्भातील खर्च जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती शैलेश पवार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या बाबत कळवण तालुक्यातील लोकप्रतिनिधी, सर्वपक्षीय पदाधिकारी, संघर्ष समितीचे पदाधिकारी, खासदार डॉ.सुभाष भामरे, खा. डॉ. भारती पवार, आमदार राहुल आहेर आमदार दीपक चव्हाण, सटाणाचे नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या समवेत जिल्हाधिकारी यांच्याकडे संयुक्त बैठक घेऊन याप्रश्नी चर्चा करण्यात येणार आहे. या समस्येबाबत सोमवार ला होणाऱ्या बैठकीकडे सर्व शेतकरी बांधवांचे लक्ष लागून आहे.