नाशिक - कोरोनाकाळात नाशिक शहराच्या स्वच्छतेसाठी घंटागाडी कर्मचारी महत्वाची भूमिका पार पाडत आहेत. मात्र या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेकडे महापालिका प्रशासनाने पुर्णपणे दुर्लक्ष करून त्यांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप आमदार देवयानी फरांदे यांनी केला आहे. या कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर सुरक्षा साहित्य पुरवण्याची मागणी त्यांनी केली आहे.
नाशिकमधील घंटागाडी कर्मचाऱ्यांना सुरक्षेचे साहित्य द्या; आमदार देवयानी फरांदे यांची मागणी - नाशिक घंटागाडी कर्मचारी
घंटागाडी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेकडे महापालिका प्रशासनाने पुर्णपणे दुर्लक्ष करून त्यांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप आमदार देवयानी फरांदे यांनी केला आहे. या कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर सुरक्षा साहित्य पुरवण्याची मागणी त्यांनी केली आहे.
नाशिक जिल्हा राज्यात कोरोनाच्या हॉटस्पॉटपैकी एक ठरतोय. नाशिक विभागातील नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर आणि नंदुरबार या जिल्ह्यांपैकी नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे समोर आले आहे. यात नाशिक शहरातील कोरोनाचा संसर्ग सातत्याने वाढत आहे. शहर हॉटस्पॉटच्या यादीत समाविष्ट झाले आहे. कोरोना संसर्गाच्या परिस्थितीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला जास्त प्राधान्य देण्याची गरज आहे. नाशिक महानगरपालिका प्रशासन शहर स्वच्छतेमध्ये महत्वाची भूमिका असलेल्या घंटागाडी कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडत असल्याचा आरोप फरांदे यांनी केला. सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सॅनीटायझर, एन ९५ मास्क, हँन्डग्लोज मनपाने उपलब्ध करून द्यावेत, अशीही मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे केली आहे.
घंटागाडी कर्मचाऱ्यांकडे ना मास्क आहे, ना सॅनीटायझर आणि ना हँन्डग्लोज आहे. घंटागाडी ठेकेदार कुठल्याही सुरक्षा उपकरणांचा पुरवठा या कर्मचाऱ्यांना करत नाहीत. घंटागाडी कर्मचारी गरीब असल्यामुळे त्यांना जीवाचा धोका पत्करून काम करावे लागत आहे. महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे घंटागाडी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा गांभीर्याने विचार करण्यात यावा. तसेच त्यांना सुरक्षा साहित्याचा पुरवठा होत आहे किंवा नाही याची पाहणी करून साहित्य वाटपाचे छायाचित्र पालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावे, अशी मागणी देखील फरांदे यांनी केली आहे.